S R Dalvi (I) Foundation

माणूस आणि त्याचं निसर्गप्रेम!

Man and his love of nature!

माणूस हे निसर्गाचंच अपत्य असल्यामुळे जन्मतःच आईची नाळ तुटली तरी मायबाप निसर्गाशी जोडलेली नाळ त्याचं आयुष्यभर पोषण करीत राहते. कुटुंबसंस्कारातून व्यक्तिमत्व विकास होतो. प्रत्येकाचं जीवन आकारीत होण्यात निसर्गाचा वाटा मोठा आहे. पन्नाससाठ वर्षांपूर्वी सगळीकडे खेड्यांचं जीवन सारखंच होतं. सगळं लक्ष शेतीकडेच असायचं. जंगलं तोडून, पेटवून, खणून शेतीसोबत नुकत्याच बागायती आकारू लागलेल्या. आजचं निसर्गाशी फारकत झालेलं केवळ यांत्रिक जीवन हे पूर्ण वेगळं आहे. पूर्वी संपूर्ण आयुष्य खरा निसर्गसहवास अटळ असे. उदरभरण हीच एकमेव समस्या, उद्दिष्ट असल्यामुळे त्या पूर्तीपोटी माणूस सतत घराबाहेरच्या निसर्गात वावरत असे. त्यातून निसर्गाची ओढ वाटू लागे. भीती, सुखदुःखात त्याचाच आधार वाटे.

माझ्या बालपणी शाळा हे गावातले सवंगडी एकत्र होण्याचं एकमेव माध्यम होतं. शाळेबाहेरचं विश्व हे निसर्गसहवासाचं असे. सकाळी उठलं की मागीलदारी शेणकुटाची मशेरी चोळताना आकाशावेरी पोचलेल्या बिवळ्याच्या शेंड्यावर सोनेरी किरणं ऊब घेत रेंगाळताना दिसायची. आकाशातून पोपटांचे मोठमोठे कळप वायव्य-उत्तरेकडून आग्नेयेकडे कलकलत जाताना दिसतं. चिकूच्या चारपाच झाडांवरून कावळ्यांची किरकीर सुरू होई. अनेक प्रकारची पाखरं उडत असायची. खारींचा मनसोक्त संचार सुरू झालेला असे. खुराड्यातून बाहेर हाकललेले कोंबड्यांचे कळप आपापल्या हद्दीत दाणे टिपीत फिरत. सकाळपासूनच्या वावरात लहानथोर सगळेच आपापलं काम सांभाळीत. पाणी, शेणगोठा, शिंपणं इ. काम करावंच लागे. इथे निसर्गाशी मैत्री सुरू होई. विहिरींवरून आयाबायांचं शेंदून पाणी भरणं सुरू झालेलं असे. पायरहाट, बैलरहाट कुरकरू लागलेले असत. फुलझाडं, माडपोफळी, केळी, पानमळ्यांची आगरं रहाटाचं शेण कालवलेलं पाटपाणी कंसवाकड्या हातभर शेलन्याने उडवून शिंपली जात. रहाटगाडग्यातल्या पाण्याची काचेसारखी स्वच्छ धार कोळंब्यातून पन्हळात आणि तिथून घसघसत दोणीत पडत असे. तिथे हांडे, कळशा लावून घराघरात पाणी भरलं जाई. घराघरातून घरणींनी तव्यावर टाकलेल्या नाचणीच्या भाक-यांचा खमंग वास वाडीभर दरवळत असे. भराभर चुळा मारून गुळाचा चहा आणि गरम भाकरी खाण्यात ब्रह्मानंदी टाळी लागे. नंतर दप्तर काखोटीला मारून शाळेकडे जाणं ही निसर्गयात्राच असे. अनेक स्टाॅप घेत घेत रोजचे मित्र एकत्र होत. निसर्गातल्या अनेक गंमतीजमती बघीत, इकडे तिकडे दगड मारीत शाळेकडे मार्गक्रमण होई..

वर्षातून चारदोन वेळा सकाळीच शंकर कातक-याची फेरी होई. मग शाळेला बुट्टी!😄
वांदर, माकडं मारून उपजीविका करणारा म्हणून त्याला ‘वांदरमारा’ असं नाव पडलं होतं. त्याचं ‘निकम’ हे आडनाव पुढे त्याच्या नातवाकडून मला कळलं. घरावरच्या आंबीवर, वडचीजवळच्या हेळ्यावर, मळ्यातल्या पिंपळावर चढून तो पोखरातले कांडेचोर मारी. एक धनुष्य व स्वतःच बोटभर जाडीचे भरीव बांबू पाते-याच्या जाळात तापवून ते सरळ सुतात करून तयार केलेले दोन बाण एवढीच हत्यारं असत; सोबत एखादा आकडीकोयतीवाला पोरगा व तिखट हडकुळा कारवानी कुत्रा असे. क्वचित खूप दूरचा वेध घेऊन अंगठा न वापरता तर्जनी व मध्यमेच्या चिमटीत पकडून मारलेला बाण निसटता लक्षवेध होऊन कुठेतरी पडून तो शोधून मिळाला नाही तर शंकर पुन्हा मूळ जागेवर जाऊन धनुष्याच्या त्याच ओढीने दुसरा बाण मारीत असे. तो जिथे पडेल तिथेच जवळपास पहिला बाण नक्की सापडे. स्वतःच्या नेमबाजीवर विसंबून आपल्यासह कुटुंबाची टीचभर पोटं भरण्याची खात्री असे.👍😅

शंकर काटेरी कुंपणं सहज ओलांडी. विशिष्ट झाडांच्या ढोली त्याच्या ओळखीच्या असत. बघता बघता झाड वेंगून तो वर चढे. अनेक फांदे, ढोली तपाशीत तो एखाद्या मोठ्या फांद्याच्या ढोलीच्या तोंडावरील वहिवाटीवरून आतल्या कांडेचोराच्या संख्येचा अंदाज करून म्हणे, ‘मलन हाय!’ म्हणजे वाट मळणीची आहे. ही त्याचा चेहरा उजळणारी खूण असे. तो आंब्याच्या टहाळांचा बोथा मारून ती चालू ढोल बंद करी. बंद ढोलीच्या हात दोन हात पुढे सरकून बैठक मारी. हातातल्या बाणाच्या टोकांने ढोलीच्या पोकळ फांद्याला आत हात जाईल एवढं नवं पोखर मारी. काही वेळा बाण खाली पडला तर त्याचा मुलगा धनुष्याच्या प्रत्यंचा बेळावर बाण लावून झाडावर बाप बसलेल्या जाड फांद्याखाली रुतेल इतपत अलगद बाण मारी. शंकर खाली हात करून तो ओढून काम सुरू करी. झाडाखाली वर बघीत शंकराचा कुत्रा गुरगुरत इकडे तिकडे नाचत राही. नवं पोखर पडलं की शंकर त्यात हात घालून आतल्या कांडेचोराची शेपटी पकडून त्याला ओढून बाहेर काढी. तो कांडेचोर हाडं चुरूनच अर्धमेला होई. बाहेर काढताच अर्धगोल फिरवून फांद्यावर आपटून त्याला मारी. तो फांद्यावर ठेवी. मग दुसरा..तिसरा..! गडबडीत एखादा पडलाच खाली तर कुत्रा त्याचा ताणपट्टा काढी. ही मृगया बघून अंगभर एक भीतीदायक थरथर भरून राही. रात्री झोपेतही तेच दिसत राही. पुढे काही दिवस तेच आठवत राही. शंकराचं ते जीवन नको वाटे. शाळा,अभ्यास करणं व निसर्गमाया बरी वाटे. शेतीतले कष्ट सुखाचे वाटत. पुढे शंकराच्या मुलांपैकी हरी शिकारीसोबत मधपोळी काढी. त्यातला मध किंमतीत घासाघीस न करता घरात घेत असत. कारण तो खात्रीचा असे. त्यांना आमच्या घरातून जेवणखाण, शिधासामुग्री, सुक्या खोब-याचा घुडघुडा नेहमीच दिला जाई. त्यानंतरच्या काळात शिकारबंदी आली. हरीचा पोरगा दत्ता वंशपरंपरेने अडाणी राहून पोरवडा सांभाळीत रानपाखरासारखं आज इथे तर उद्या तिथे असं अनिर्बंध, स्वच्छंदी जीवन जगत आहे. कुटुंबात माझ्या मनात पेरले गेलेले निसर्गओढीचे संस्कार मृगयेच्या ह्या आदीम पद्धतीमुळे ‘द फाॅल आॅफ अ स्पॅरो’ सारखे दृढमूल झाले असावेत.🌿🙏🏼😄

Scroll to Top