S R Dalvi (I) Foundation

दुपारचं उन्ह कसं घातक ठरतं?

How is afternoon sun dangerous?

महाराष्ट्रासह देशभरात तापमानाचा पारा चांगलाच चढलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस 13 जणांचा उन्हाने मृत्यू झाल्याचा आणि शेकडो लोकांना उन्हाचा त्रास झाल्याचं आपण पाहिलं आहे. त्यातही अनेक लोकांना बराच काळ उपचार घ्यावा लागला.

त्यामुळेच हे दुपारचं उन्ह आपल्यासाठी का घातक ठरतं तसंच या उन्हामुळे नक्की काय होतं ते आपण पाहाणार आहोत.

एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहील, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिलाय.

जेव्हा मैदानी भागात कमाल तापमान 40 अंश, किनारी भागात 37 अंश आणि डोंगराळ भागात 30 अंश इतकं असतं तेव्हा उष्णतेची लाट आल्याचं म्हटलं जातं.

1901 नंतर थेट 2023 चा फेब्रुवारी महिना भारतातील सर्वांत उष्ण महिना होता.

वातावरणात उष्णता वाढल्याने दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि उघड्यावर राहणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉक्टरांच्या मते, लोकांनी सावधगिरी बाळगून स्वतःला सुरक्षित ठेवायला हवं.

शरीरात नक्की काय होतं?

जसजसं तापमान वाढतं तसं शरीर गरम व्हायला लागतं. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्तदाब घसरतो आणि सगळ्या शरीरभर रक्त पाठवायला हृदयाला जास्त कष्ट घ्यावे लागतात.

यामुळे शरीरावर पुरळ, चट्टे दिसतात किंवा रक्तवाहिन्या मोठ्या झाल्यामुळे पाय सुजल्यासारखे दिसतात.

याचवेळेस शरीरातून वेगाने घाम बाहेर पडत असतो. हा घाम निघून जाण्यामुळे शरीरातील पाणी, द्रवपदार्थ आणि क्षारांचं प्रमाण घसरतं.

वरील स्थिती आणि रक्तदाब कमी होण्यानं पूर्ण गळून गेल्यासारखं होतं. द्रवपदार्थ निघून गेल्यामुळे रक्त घट्ट होतं आणि स्नायू निकामी होऊ लागतात. शऱीराचं तापमान आणखी वाढलं की आपल्या शरीरातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं.

त्यामुळेच विविध अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि ते निकामी होऊ लागतात. यामुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो. अवयव बंद पडत गेल्यामुळे मृत्यू येतो.

आता उन्हाळा आलाय म्हटल्यावर तो सर्वांसाठीच आलाय. वातावरणाला सर्वच जण सारखे आहेत. पण याचा सर्वांवरच सारखा परिणाम होतो असं नाही.

काही लोकांकडे या वातावरणापासून आराम मिळवण्याची संसाधनं असतात, तर काही लोकांकडे नसतात. शिवाय प्रत्येकाचं आरोग्यही एक सारखं नसतं. त्यामुळे वातावरणाचा प्रत्येकावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.

डॉक्टरांचा सल्ला

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी डॉक्टर काही महत्त्वाचे सल्ले देतात. म्हणजे वातावरण सामान्य असो किंवा जास्त, तुम्ही स्वतःला उष्माघातापासून वाचवू शकता.

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी आणि इंटर्नल मेडिसिनचे डॉक्टर विनीत अरोरा सांगतात की, तुमच्या शरीरात पुरेशा पाण्याचं प्रमाण असणं आवश्यक आहे. घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट कमी होतं. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स उपलब्ध आहेत, लोक ते घेऊ शकतात.

याशिवाय टरबूज, कलिंगड ही सिजनल फळं पाण्याचा उत्तम स्रोत आहेत. त्यांचं सेवन केलं पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही ओआरएसचं सेवन करू शकता. लिंबू पाणी, नारळ-पाणी आणि अशी फळे जास्तीत जास्त घ्यावीत, कारण यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हंगामी भाज्या आहारात घ्याव्यात.

जर ज्यूस, ओआरएस तुमच्या बजेट मध्ये बसत नसतील तर मीठ-साखर-पाणी असं मिश्रण तुम्ही पिऊ शकता. हे घरच्या घरी सहज बनवताही येतं आणि त्यासाठी कोणता खर्चही येत नाही.

या सगळ्या बरोबरच ताक देखील एक चांगला पर्याय आहे.

ताकात पोटॅशियम असतं, आणि शरीरात सोडियम आणि पोटॅशियम सॉल्टचा समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे.

आपण जेव्हा उन्हात बाहेर जातो आणि आपल्याला घाम येतो तेव्हा हे दोन्ही घटक शरीरासाठी महत्त्वाचे ठरतात.

ज्या लोकांना किडनी किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या गोष्टींचा आहारात समावेश करावा.

शरीरातील पाण्याचं प्रमाण

सध्या देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मैदानी भागात तापमान 40 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त किंवा सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचं घोषित करतात. उष्ण वारे वाहत असताना घराबाहेर पडल्यास शरीरातील आर्द्रतेचं प्रमाण कमी होऊ लागतं. बाहेर उष्ण वारे वाहत असतील तर जितकं होता होईल तितकं बाहेर जाणं टाळा. कामाच्या वेळा बदला. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर पडणं टाळा. पण प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही. कारण उष्णतेसोबतच उदरनिर्वाहाचाही प्रश्न आपल्यापुढे असतो. अशात उष्माघातापासून वाचण्यासाठी लोकांनी काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

कोणते कपडे वापराल आणि काय खाल?

उष्णतेपासून वाचण्यासाठी हलक्या रंगाचे कपडे परिधान करून बाहेर जा, जेणेकरून उष्णतेपासून बचाव होईल.

सुती कपडे वापरणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. जे लोक जास्त शारीरिक श्रम करतात, त्यांनी ओआरएस प्यायला हवं.

ओआरएस उपलब्ध नसल्यास साध्या पाण्यात साखर-मीठ टाकून ते घ्यावं म्हणजे शरीरात इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राहील. लिंबूपाणी आणि ताक हे देखील उत्तम पर्याय आहेत.

तुम्हाला उष्माघाताचा झटका आलाय हे कसं ओळखाल?

उष्माघाताच्या महत्वाच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, जास्त घाम, चक्कर, स्नायू आखडणे, मळमळ झाल्यासारखं वाटणं ही लक्षणे आहेत.

जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर ताबडतोब सावलीत किंवा थंड ठिकाणी जा. फॅन किंवा एसीमध्ये जाता आलं तर उत्तम. तुम्ही झाडाच्या सावलीतही बसू शकता. पाणी आणि ओआरएस पिऊ शकता.

जर एखाद्याच्या शरीरातून घाम येणं बंद झालं असेल, त्याला ताप चढला असेल, चक्कर येत असेल तर तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावीत.

एसीतून अचानक उन्हात गेल्यावर काय होतं?

सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे शरीराला तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. तापमानात अचानक होणारा बदल शरीरासाठी धोकादायक असतो. यासाठी एक शब्द वापरला जातो – ट्रांजिशन.

समजा तुम्ही कारने प्रवास करताय आणि तुम्हाला माहिती आहे की, कार मधून उतरल्यावर बाहेर एसी नाहीये, तेव्हा ठिकाणावर पोहोचण्याच्या तीन ते चार मिनिटे आधीच तुमच्या कारचा एसी बंद करा.

जेणेकरून तुमचं शरीर बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेईल. नाहीतर बऱ्याचदा तुम्हाला ऍलर्जी होऊ शकते. कधीकधी ब्लडप्रेशर कमी जास्त होऊ शकतं. आणि इम्युनिटीसाठी या गोष्टी चांगल्या नाहीत.

Scroll to Top