S R Dalvi (I) Foundation

मुक्ता साळवे : ‘पहिली महिला दलित लेखिका’

Mukta Salve: ‘The First Woman Dalit Writer’

मुक्ता साळवे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी पुण्यात सुरू केलेल्या शाळेतली एक विद्यार्थिनी. लिहायला-वाचायला शिकता शिकता मुक्ताला तिचा आवाज गवसला. त्यातून तिचा पहिला निबंध जन्माला आला.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ या तिच्या छोटेखानी निबंधात मुक्ता केवळ दु:ख मांडून थांबत नाही तर या दु:खाची कारणं मांडते. तत्कालिन सामाजिक विषमतेवर जोरदार प्रहार करते.

ही घटना आहे 1855 मधली, जवळपास 167 वर्षांपूर्वीची. तेव्हाही तिच्या लेखनाची चांगलीच दखल घेतली गेली. आजही मुक्ताचा निबंध हा ‘दलित स्त्री साहित्याचा पहिला हुंकार’ मानला जातो. ही प्रखर अभिव्यक्ती करणाऱ्या मुक्ता साळवे यांची ओळख.

मुक्ता साळवेंचा जन्म 1840 साली पुण्यात झाला. जातीपातीत काटेकोर विभागलेला आणि सवर्णांचे वर्चस्व असलेला तो काळ. मुक्ताचा जन्म तर मातंग, म्हणजे त्याकाळी अस्पृश्य मानलेल्या जातीतला.

जातीच्या उतरंडीत तळात असल्याने समाजाकडून मिळणारी मानहानी पाहात, झेलत त्या मोठ्या झाल्या. तेव्हा प्रचलित असलेलं धार्मिक शिक्षण केवळ ब्राह्मण जातीपुरतं मर्यादित होतं. ना स्त्रियांना शिकायला परवानगी होती, ना समाजाच्या लेखी तुच्छ मानलेल्या ‘अस्पृश्यांना’.

पेशवाई अस्ताला जाऊन ब्रिटीश राजवट पाय पसरू लागली होती. जातीभेदाचे जोखड सैल होत होते. इंग्रजांनी सरकारी शाळा सुरू केल्या.

मिशनऱ्यांतर्फे सुरू असलेल्या काही शाळा हिंदू मुलींसाठी खुल्या होत्या. पण ज्यांना आजवर शिक्षणापासून हेतूत: दूर ठेवलं त्यांची या शाळांपर्यंत पोहोच अद्याप नव्हती. मुक्ताचा शाळेशी संपर्क यायला 1851 साल उजाडावं लागलं.

जोतिबा आणि सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे ते पहिले भारतीय.

या शाळा सर्व समुदायाच्या मुलींसाठी खुल्या होत्या. 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात त्यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सामाजिक विरोधाला न जुमानता चालू ठेवली.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’

एकच शाळा सुरू करून चालणार नव्हतं. ज्यांना ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं त्यांच्यापर्यंत शाळा नेण्याची गरज होती. ती ओळखून फुले दांपत्यानं पुण्यात ठिकठिकाणी शाळा सुरू केल्या. दुसरी शाळा बुधवार पेठमधील चिपळूणकर वाड्यात 1851-52 मध्ये सुरू झाली. त्याच वर्षी तिसरी शाळा वेताळ पेठ, म्हणजे आत्ताची गुरुवार पेठ, येथे सुरू झाली.

जोतिबा-सावित्रीबाईंच्या शिक्षणप्रसाराच्या कामाला पाठिंबा असलेल्यांनी त्यांना ठिकठिकाणी शाळा काढायला मदत केली. त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे लहुजी साळवे. त्यांच्या तालमीमध्ये जोतिबा जात असत. क्रांतीगुरू वस्ताद म्हणून ओळखले लहुजी साळवे रास्ता पेठमध्ये युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र चालवायचे. शिक्षणप्रसाराच्या चळवळीलाही त्यांचे पाठबळ होते.

लहुजी साळवे यांची पुतणी असलेली मुक्ता ही वेताळ पेठेतल्या तिसऱ्या शाळेतली विद्यार्थिनी. मांग/मातंग समाजातली शाळेत जाणारी पहिली मुलगी! शाळेत भरती झाली तेव्हा ती 11 वर्षांची होती.

‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ हा पहिला निबंध समोर आला 1855 मध्ये. तिला शाळेत जाऊन केवळ तीन वर्षे झाली होती. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहिलेल्या निबंधाने तिचं नाव इतिहासात अजरामर झालं. एका दलित स्त्रीने केलेलं हे पहिलं वहिलं लेखन म्हणून त्याचं महत्त्व तर आहेच, त्यातील आशय आजही विचार करायला लावणारा आहे.

ईश्वराला उद्देशून सांगितलेल्या ‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ बोलणाऱ्या मुक्ताचं सामाजिक स्थितीचं भान तिच्या हरेक शब्दातून व्यक्त होते. तिची देवाकडे तक्रार आहे की आम्हाला धर्मव्यवस्थेच्या बाहेरचं मानलं जातं.

या धर्मव्यवस्थेचा अंकुश स्वत:च्या नियंत्रणात ठेवणाऱ्या ब्राह्मण समाजाला ती ‘लाडूखाऊ’ म्हणून संबोधते! “बाह्मण लोक असे म्हणतात की, वेद तर आमचीच मत्ता आहे. आम्हीच ह्यांचे अवलोकन करावे. तर ह्यावरून उघड दिसते की, आम्हास धर्मपुस्तक नाही. जर वेद बाह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे बाह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की नाही बरे?”

याला जोडूनच ती धर्माची चिकित्साही करते. आमचा धर्म कोणता? असा प्रश्न जगनियंत्याला विचारून एखादा धर्म कसा असावा हे आपलं मतही सांगते.

“तर हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेस पहावे. तो व त्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत; व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो.”

मुक्ता साळवेंचा शिक्षणप्रवास खरंच थक्क करणारा आहे.

या निबंधाने उठवलेले विचार मोहोळ तत्कालिन चर्चेपुरतंच सीमित नव्हतं. मुक्ता साळवे यांनी मांडलेले विचार आणि मुद्दे समाजभान देणारे तसंच संदर्भ म्हणून महत्त्वाचे होते.

महात्मा फुले, बाबा पदमजी आणि रेव्हरंड मरे मिचेल यांचे मित्र असलेल्या ना. वि. जोशी यांनी आपल्या ‘पुणे शहराचे वर्णन’ या 1868 साली प्रकाशित ग्रंथातही मुक्ताच्या निबंधाचा काही भाग छापला. या मराठी निबंधाचा इंग्रजी अनुवाद, सुसी थारु (Susie Tharu) आणि के. ललिता (K. Lalita) यांनी लिहिलेल्या ‘Women Writing in India: 600 BC to Present’ पुस्तकात आहे. 1991 साली हे पुस्तक प्रकाशित झालं.

आजही मुक्ता साळवेंचा मूळ निबंध इंग्रजी, हिंदी अनुवादासह इंटरनेटवर उपलब्ध आहे.

‘मांग महारांच्या दु:खाविषयी’ या निबंधातून लिहिती झालेली चौदा वर्षांची मुक्ता साळवे आज ‘आद्य दलित लेखिका’ म्हणून ओळखली जाते.

मुक्तानं पुढे काय लिखाण केलं यांसह तिची बाकी माहिती आज उपलब्ध नाही. तिचा बाकी इतिहास पुसला गेला असली तरी तिचं पहिलं, कदाचित एकमात्र लिखाण जिवंत आहे. ते जितकं परखड आहे तितकंच प्रेरणादायीही आहे.

जेव्हा निबंध जाहीरपणे वाचला गेला…
आत्मभान आणि परिस्थितीचं भान देणारं शिक्षण दिलं आणि धर्मचिकित्सा करत व्यवस्थेला प्रश्न विचारायलाही शिकवलं. हे खरं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. अशा शिक्षणाच्या प्रवाहात आलेली व्यक्ती झपाटून, बदलून जाते.

मुक्ताचा निबंध 1855 मध्ये ‘ज्ञानोदय’च्या अंकात दोन भागात छापून आल्याने अनेक वाचकांपर्यंत पोहोचला. पहिला भाग 15 फ्रेबुवारी (पूर्वार्ध) आणि दुसरा 1 मार्चला (उत्तरार्ध) प्रकाशित झाला. नंतर या निबंधावर प्रतिक्रिया म्हणून दोन पत्रेही छापली गेली. त्याचवर्षी हा निबंध इंग्रज शासनाने मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये छापला.

आपला निबंध मोठ्या जनसमुदायासमोर वाचायची संधीही मुक्ताला मिळाली.पूना कॉलेजचे प्राचार्य, सरकारी शिक्षामंडळाचे प्रमुख आणि फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे हितचिंतक मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबागवाडयात जोतिबांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

तिथे साधारण 3 हजार लोकांच्या उपस्थितीत मुक्ताने आपला निबंध वाचला. तो ऐकून मेजर कॅंडी प्रभावित झाले. त्यांनी तिचे कौतुक करत तिला चॉकलेट देऊ केले.

मेजर कॅडींना बाणेदारपणे उत्तर देत मुक्ता म्हणाली, “सर, आम्हाला चॉकलेट नको, वाचनालयाची सोय करून द्या!” त्याकाळात एका दलित मुलीने पुस्तकांची मागणी करणे किती विलक्षण आणि क्रांतिदायी होते.

Scroll to Top