S R Dalvi (I) Foundation

सुंदरलाल बहुगुणा : ‘झाडांआधी आम्हाला कापा’ असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया

Sundarlal Bahuguna: who taught us to hug the tree saying ‘Cut us before the trees’

सुंदरलाल बहुगुणा, झाडं, पर्यावरण, हवामान बदल

“आपण आपल्या पृथ्वीवर अत्याचार करत आहोत, निसर्गावर अत्याचार करत आहोत. आपण निसर्गाचे खाटिक झालोत”, एका मुलाखतीत सुंदरलाल बहुगुणा सांगत होते.

बहुगुणा यांचं वयाच्या 94 व्या वर्षी कोव्हिड-19 आजाराने निधन झालं. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी झाडांना मिठी मारायला शिकवणारा अवलिया, म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखतं. 1970 च्या दशकात उत्तर भारतात सुरू झालेल्या चिपको आंदोलनातले ते महत्त्वाचे नेते होते. ‘चिपको’ म्हणजे ‘मिठी मारणे’.

सुंदरलाल बहुगुणा आणि त्यांचे सहकारी चांदी प्रसाद भट्ट यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो स्त्री आणि पुरुषांनी सर्व बाजूंनी साखळी करत झाडांना मिठी मारून वृक्षतोडीपासून वाचवलं आहे. ‘झाडांआधी आम्हाला कापा’, असा तो संदेश होता.

या आंदोलनाने जगातील सर्वांत उंच पर्वतावर पर्यावरणाच्या संकटामुळे जो विनाश ओढावत होता, त्याकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं.

1970 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने स्थानिक गावकऱ्यांचे डोळे उघडले. या महापुरामुळेच “जंगलतोड, भूस्खलन आणि पूर यांच्यातला संबंध स्पष्ट झाल्याचं” इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी चिपको आंदोलनाचं वर्णन करताना म्हटलं होतं.

या महापुरानंतर तीन वर्षांनी बहुगुणा आणि सहकारी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारण्याचं आंदोलन सुरू केलं. निसर्ग संवर्धनासाठी तरुणांनी बोट कापून शपथा घेतल्या.

लवकरच हिमालयाच्या कुशीतल्या गावांमधल्या स्त्रियांनीही या आंदोलनात उडी घेतली. त्या झाडांना मिठी मारायच्या, झाडांना राखी बांधायच्या. इतकंच नाही तर वृक्षतोड करण्यासाठी आलेल्यांची हत्यारंही पळवायच्या.

सुंदरलाल बहुगुणा, झाडं, पर्यावरण, हवामान बदल, चिपको आंदोलन

हिमालयाच्या कुशीतच जन्माला आलेले बहुगुणा यांनी सर्व धागे बरोबर जुळवले होते. जंगलतोडीमुळे सुपीक जमिनीची धूप झाली आणि त्यामुळे गावातल्या तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी शहराची वाट धरावी लागली, असं बहुगुणा सांगत.

गावातली पुरुष मंडळी शहरात गेल्याने गावात मागे राहिलेल्या महिलांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली. शेतीसोबतच गुरांसाठी चारा आणणे, जाळणासाठी लाकूड तोडून आणणे, नदी-विहिरींवरून पाणी भरून आणणे अशी सगळी कामं स्त्रिया करू लागल्या आणि म्हणूनच महिलांच्या अधिकारांसाठीच्या लढ्यात चिपको आंदोलनही एक मैलाचा दगड ठरला.

वर्षागणिक बहुगुणा यांच्या आंदोलनाला बळ मिळत गेलं. स्त्रिया आणि महाविद्यालयीन तरुण त्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले. ते शांततामय मार्गाने निदर्शनं करत, वृक्षतोड करायला येणाऱ्यांसमोर झाडांना मिठ्या मारत, उपोषण करत.

सुंदरलाल बहुगुणा, झाडं, पर्यावरण, हवामान बदल, चिपको आंदोलनुु

अखेर या सर्वांचा परिणाम झाला. 1981 साली केलेल्या उपोषणानंतर सरकारने उत्तराखंडमध्ये व्यावसायिक वापरासाठी झाडांची कत्तल करण्यावर 15 वर्षांसाठी बंदी आणली. दोन वर्षांनंतर हिमालयात होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी 4 हजार किमीची पदयात्रा केली.

काश्मीर आणि कोहिमाच्या या यात्रेनंतर त्यांनी 1992 साली भारतातील सर्वांत उंच धरण असलेल्या टिहरी धरणाच्या बांधकामाविरोधातही आंदोलन केलं. या धरणाविरोधात त्यांनी मुंडन करत उपोषण केलं. या धरणात इतर शेकडो लोकांप्रमाणेच बहुगुणा यांचंही वडिलोपार्जित घरं गेलं होतं.

जंगलतोडीसाठी वन अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्यातल्या संगनमताविषयी ते कायम उघडपणे बोलायचे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बहुगुणा यांच्या आंदोलनाविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, “खरं सांगायचं तर मला त्यांच्या आंदोलनामागचा नेमका उद्देश काय आहे, ते माहिती नाही. पण, त्यांना जर खरंच वृक्षतोड थांबवायची असेल तर मी त्यांच्यासोबत आहे.”

काळ पुढे सरकला असला तरी बहुगुणा यांच्या आंदोलनातून आजही प्रेरणा मिळते. 2017 साली मुंबई मेट्रोसाठी जवळपास 3000 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. पण, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी झाडांना मिठी मारून ती वृक्षतोड थांबवली होती.

साधी राहाणी आणि म. गांधींच्या तत्त्वांवर चालणारे बहुगुणा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. एका छोट्या आश्रमात ते राहत. हिंसेला त्यांचा तीव्र विरोध होता आणि राजकारणापासून त्यांनी स्वतःला कायम दूर ठेवलं होतं. परदेशातून व्यापार करण्याऐवजी आत्म-निर्भरतेवर त्यांचा अधिक विश्वास होता. ते भौतिकवादाचा विरोध करायचे.

मानवी विष्ठेपासून बायोगॅस निर्मिती, सौर आणि पवन ऊर्जा, जलविद्युत निर्मिती याद्वारे भारत ऊर्जेबाबत ‘अहिंसक आणि शाश्वत’ मार्गाने स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा विश्वास त्यांना होता. कमी ऊर्जेवर चालणारी यंत्र विकसित करावी, असा सल्लाही ते देत.

आज उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टिहरीमध्ये 1927 साली सुंदरलाल बहुगुणा यांचा जन्म झाला. सालवृक्ष, ओकवृक्ष यांनी वेढलेल्या झाडा-झुडुपांनी समृद्ध अशा निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं बालपण गेलं.

त्या सहलीच्या आठवणी सांगताना तिथे वादविवाद किंवा संघर्ष करणारा नाही तर एक मितभाषी, सौम्य आणि सहृदयी माणसाचं दर्शन झाल्याचं ते सांगतात. अमाप वृक्षतोडीमुळे हिमालयातले झरे कोरडे पडत चालल्याचं त्यांनीच सर्वप्रथम निदर्शनास आणून दिल्याचं बरुहा म्हणतात.

हिमालयातून वाहणारे झरे कोरडेठाक पडल्याचं आणि दूरवरून पाणी भरुन आणणारे स्थानिक आपल्याला दिसल्याचं बरुहा सांगतात. स्वतःच्याच अनुभवातूनच बहुगुणा यांना आंदोलनाची प्रेरणा मिळाल्याचं बरुहा सांगतात. पर्यावरण रक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारा ‘धरणीपुत्र’ म्हणून सुंदरलाल बहुगुणा कायम स्मरणात राहतील.

Scroll to Top