S R Dalvi (I) Foundation

मुलांचे आरंभिक शिक्षण

Early education of children 

मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात. जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे.

आरंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण याचा अभ्यासक्रम व शिक्षणपद्धती ठरवण्याची जबाबदारी एन.सी.ई.आर.टी. म्हणजेच  शिक्षण मंत्रालयाची असेल आणि त्याची योग्य प्रकारे कार्यवाही करण्यासाठी महिला व बालविकास, आरोग्य व कुटुंबकल्याण आणि आदिवासी विकास विभाग या खात्यांबरोबर समन्वय साधला जाईल, असे म्हटले आहे. मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्य आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात.

साधारणपणे वय वर्षे तीन ते सहा या वयोगटातील बालकांची औपचारिक बाल शिक्षणाचीही सोय अंगणवाड्यांमधून अभिप्रेत आहे. तसे पाहता या वयोगटातील बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण हे तीनही घटक त्या बालकांच्या विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहेत. पुढे प्राथमिक शिक्षणाच्या पायाभरणीचे महत्त्वाचे कार्य या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. कारण या वयोगटात या बालकांचे अनारोग्य किंवा आरोग्य या दोन्ही बाबी बौद्धिक विकासावर अनुक्रमे प्रतिकूल वा अनुकूल परिणाम करतात. अशावेळी, परिणामांची प्रतिकूलता कमी करून अनुकूलता वाढविण्याबाबत अंगणवाडी या बालविकास केंद्राची जबाबदारी फार मोठी आहे. आज ‘अंगणवाडी’ या बालविकास केंद्राचा बारकाईने विचार केल्यास लक्षात येईल की, येथे येणारी किंवा प्रवेश घेणारी बालके अधिक प्रमाणात समाजाच्या निम्नस्तरातून येतात. मध्यमवर्गीय समाजातील कुटुंबापेक्षा कमी उत्पन्न गटात मोडणाऱ्या कुटुंबातील मुलांची संख्या इथे जास्त दिसते. यामागे अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कारणे आहेत. त्यात न पडता आज अंगणवाडीत येणाऱ्या मुलांचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. कारण आज भारतात साधारण चौदा लाख अंगणवाडी केंद्रे असून त्यात चार कोटींपेक्षाही जास्त बालकांची काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्राचा विचार करता लाखभर अंगणवाडी केंद्रे असून त्यात पन्नास लाख बालके आहेत. त्यामुळे, आज प्रत्यक्ष अंगणवाडीतील दाखल बालके ही इतर मुलांच्या शिकण्याच्या तुलनेत आणि आपण पुढे जाऊन ज्या प्रगत मूल या संकल्पनेत पाहू इच्छितो, तिथे ते मागे राहायला नको असतील, तर अंगणवाड्यांमधील औपचारिक शिक्षणाचं अंग अधिक बळकट व्हावे लागेल. विशेषतः गरीब मुलांना सामावून घेण्यासाठी अंगणवाडी अधिक सजग आणि समृद्ध करावी लागेल. यात केवळ भौतिक सुविधा नाहीत, तर बाल मानसशास्र आणि बाल अध्यापन शास्त्र यांची कास तितकीच समर्थपणे स्वीकारायला हवी. अंगणवाडीचे भावी रूप हे केवळ या सर्व लहान बालकांना संधी देणारे म्हणून ‘सर्वसमावेशक’ असणार नाही, तर त्या मुलांना त्यांच्या बहुविध बुद्धिमत्तांना वाव देतानाच, बुद्धी, भावना, भाषा आणि सामाजिकता यांच्या विकासासाठी संपन्न अनुभव देणारी, अशी शिक्षणाची नवी मांडणी करणे कसे योग्य ठरणार आहे, या विचारावर उभे राहायला हवे आहे.

बालशिक्षण म्हणजे बालवाडी, खेळवाडी, काही प्रमाणांत अंगणवाडी अथवा के-जी, माँटेसरी, नर्सरी या नावांनी चालवल्या जाणाऱ्या बाल शाळांतील शिक्षण होय. आपल्याकडे सहाव्या वर्षी शालेय औपचारिक शिक्षण सुरू होते. त्यापूर्वीचे अनौपचारिक शिक्षण म्हणजे बाल शिक्षण होय. साधारणपणे अडीच ते सहा वर्षापर्यंतची मुले या ‘शाळां’त शिकत असतात. त्यापूर्वी अर्थातच, या लहान मुलांचे ‘शिक्षण’ घरच्या घरी आणि सहजतेने होत असते. बालशिक्षणाचे क्षेत्र हे मुलांच्या मुक्त विहाराचे क्षेत्र असते. तेथे शिकवण्याला स्थान नसते. तेथे शालेय विषय नसतात. विषयांचे शिक्षण-प्रशिक्षण घेतलेले शिक्षक तेथे निरुपयोगी ठरतात. बालशिक्षण हे सहज शिक्षणाचे क्षेत्र असते. तेथे त्या बालकांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे वातावरण मिळणे ही तेथील प्रत्येक बालकांची पहिली गरज असते. ती पूर्ण होणे महत्त्वाचे असते अन्यथा त्याचा परिणाम पुढील शिक्षणावर दिसतो. याच काळात मुलाच्या शरीराचा आणि मेंदूचा विकास हा झपाट्याने होतो. त्या विकासाला योग्य वातावरण आणि दिशा मिळाली तर ते बालपण सर्वार्थाने फुलून निघते.

Scroll to Top