S R Dalvi (I) Foundation

शाळा नको.. मला खेळायचे आहे? जाणून घेऊयात मुलांची मानसिकता.

No school.. I want to play? Let’s observe the mindset of children.

करोना काळानंतर पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्या, एकीकडे चिमुरड्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी लगबग दिसते तर दुसरीकडे शाळेत जाऊ नये यासाठी रडणारे विद्यार्थी देखील दिसतात. ‘चला शाळेत जाऊया’ हे वाक्य तसे फारसे मुलांना आवडत नाही. पालकांनो तुमच्या मुलांना शाळेत जाण्याचा कंटाळा येतो का? तुमच्या मुलांना शाळा का आवडत नाही? विद्यार्थ्यांना शाळा न आवडण्यामागची काय कारणं असू शकतात?

करोना प्रादुर्भावाच्या काळात झालेल्या ऑनलाइन शिकवणीनंतर २०२२-२३ शैक्षणिक सत्र ऑफलाइन अभ्यासाने सुरू झाले. करोना काळात गेल्या दोन वर्षांपासून प्ले स्कूलही बंद होती त्यामुळे अनेक मुलांनी यंदा थेट पहिलीत प्रवेश घेतला आहे. लहान वर्गातली मुलांसहीत मोठ्या वर्गातील मुलांना देखील नव्या जगाशी जुळवून घेणं थोडं अवघड जात आहे. या दोन वर्षाच्या काळात इतर क्षेत्राप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत देखील बरेच बदल झालेले आपण पाहीले. ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येकाचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. दरम्यान अनेक मुले शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अस्वस्थतेत त्यांना शाळेतल्या वातावरणाशी जुळवून घेता येत नाही.

जर तुमचे मूल शाळेत जायला घाबरत असेल किंवा तिथे पोहोचल्यानंतर रडत असेल तर तुम्हाला त्याचे कारण माहित असणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात तुमच्या मुलाला तुमची गरज आहे हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
१) बर्‍याच मुलांना अपयशाची भीती वाटते. इतरांकडून थट्टा होण्याची भीती देखील त्यांच्या मनात असते. घरात आणि शाळेत इतर मुलांशी तुलना केली जाण्याची शक्यता त्यांना वाटत असते.
२) प्रत्येकाच्या शिकण्याच्या पद्धतीत आणि आत्मसात करण्याच्या पद्धतीत फरक आहे. काही मुले हळू शिकणारी (Slow learner) असतात. अशावेळी त्यांना शाळेतल्या इतर मुलांशी जुळवून घेताना त्रास होतो.
३) २ वर्षांपासून सामाजिक जीवनापासून दूर राहिल्यामुळे बहुतेक मुलांना शाळेत इतरांमध्ये मिसळणे कठीण होत आहे.
४) उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतांश मुलांचे वेळापत्रक विस्कळीत होते. ते उशिरा उठतात, स्वतःचे अन्न खातात, खेळतात आणि अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना पुन्हा रुळावर येण्यासाठी वेळ लागतो.
५) आजकाल मुलांना मोबाईल फोन आणि तंत्रज्ञानाच्या इतर साधनांचे व्यसन लागले आहे. शाळेत फोनपासून दूर राहिल्यामुळे त्यांना काही दिवस जुळवून घेणेही कठीण होऊ शकते.
पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे, मुलांची मानसिकता जाणून घेऊन त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रेरणा देण्याची आता गरज आहे.

Scroll to Top