S R Dalvi (I) Foundation

पालक-मुले – कालचे, आजचे आणि उद्याचे

Parent-Child – Yesterday, Today and Tomorrow

आज जे पालक आहेत त्यांनी त्यांच्या पालकांचा, त्या पालकांनी त्यांच्या पालकांना असे मागे-मागे जात भूतकाळाचा विचार करीत गेल्यास त्यावेळच्या पालकांच्या विचार सरणीत, दृष्टिकोनात, आचार-विचार आणि वर्तन व्यवहारात आणि आजच्या पालकांच्या आचार-विचार कर्तव्यवहारात आणि दृष्टिकोनात फरक पड़ता आहे असे जाणवते. भविष्यात हा बदल होतच राहणार आहे. त्यावेळची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती, कुटुंबव्यव वेगळी होती. पूर्वी २५ वर्षांनी पिढी बदलायची. आता अगदी पाचपाच वर्षात सर्वच बाबतीत बदल दिसू लागलेत जाणवू लागलेत. सध्याची काळ काम, वेग, आणि पाशी निगडित असलेली जीवन शैली बघता बदलाचा कालावधी पाच पेक्षाही कमी होऊ लागला आहे.

पाल्याशी निगडित असलेली त्रिकालाबाधित चांगली मूल्ये जपावीत. वाढवावयास हवीत. कालविसंगत असलेली जाणीवपूर्वक टाकावयास हवीत, परिवर्तन आणि सकारात्मक बदल ही विकासाची दोन चाके आहेत. सध्याच्या २१ व्या शतकात प्रत्येक पालकाने पाल्यास घडवताना ह्याबाबत खूपच दक्ष राहावयास हवे. कालबाह्य कालविसंगत आग्रही प्रतिपादन, उपदेश, कुसंस्कार, सूचना पाल्यास हानिकारक तर असतातच पण अंतिमतः पालकांच्याही हिताच्या नसतात.  पालकांनी नियम आणि अपेक्षा वास्तवाला धरून आहेत ना, याचा नेहमी विचार करावा. प्रत्येक लहानसहान गोष्टींवरून त्यांच्या मागे लागणे, टोचून बोलणे, उपहासयुक्त बोलणे टाळावे. मुले मोठी होत असताना प्रत्येकच गोष्टीची, ‘नियमानुसारच केली पाहिजे’ व ‘नियम शिथिल केले तरी फारसे बिघडत नाही’ अशी विभागणी करावी. उदा. कपडे, केशभूषा, त्यांच्या खोलीची, कपाटाची रचना, व्यवस्था या बाबतीत आपले नियम न लादता फक्त सूचना/प्रस्ताव द्यावेत. परंतु स्वत:च्या गोष्टींची जबाबदारी घेणे, वेळेत घरी येणे अशा बाबतीत काही नियम परस्पर संमतीने ठरवावेत व ते पाळावेत.

भूत, वर्तमान आणि भविष्य याचा पाल्याच्या जडणघडणीत काळजीपूर्वकः समन्वय साधण्याची जबाबदारी पालकांची आहे. पाल्याला निव्वळ उत्तम गुण मिळवणारा ‘रेसचा घोड़ा’ बनवून चालणार नाही. त्यास उचत भूतकाळाची जाणीव करून द्यायची असते, विविध घटना, प्रसंग व्यक्ती, गोष्टीची पुस्तके ह्याद्वारे तो / ती चारित्र्यसंपन्न कशी होईल हे पालक म्हणून भूमिका बजावणाच्या दोघांनीही म्हणजे आई-बाबांनी ती बजवावयाची असते. सध्याच्या वर्तमानातील संघर्ष, गळेकापू स्पर्धा, त्याची अपरिहार्यता याचीही सहज जाणीव पाल्यांना करून द्यायची असते. वर्तमानातल्या निसरडया वाटा, धोके हेही निर्देशित करावयाचे असते. पण हे सर्व अगदी सहज साध्या सोप्या, सरळ पद्धतीने करावयास हवे. उठ सुट उपदेशाचे डोस पाल्यांना पाजू नयेत. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांशी नित्य, नियमित केलेला मनमोकळा संवाद. दिवसातील निदान एक वेळ अशी असावी, ज्या वेळी पालक व मुले आपापल्या दिवसभरातील घडामोडी, सहवासात आलेल्या इतर व्यक्ती, आनंदाचे, रागाचे, दु:खाचे क्षण एकमेकांबरोबर मोकळेपणाने बोलू शकतील. या वेळेत अभ्यासाविषयी, परीक्षेविषयी बोलणे कधी तरी असावे.  काय करावे, कसे वागावे, काय योग्य, काय अयोग्य या विषयी बोलण्याइतकेच घरातील मोठ्या व्यक्तींनी ते वागण्यातून दाखवणे हे परिणामकारक असते. उदा. मुलांनी टीव्हीवरील कार्यक्रम जास्त पाहू नयेत असे वाटत असेल, तर पालकांचाही टीव्ही पाहण्याचा वेळ मर्यादित असावा.

मुलांशी ‘एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ अशा दृष्टीने वागावे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अपमान होईल अशा कृती, वाक्ये टाळावीत. त्यांच्या चुका अपमानास्पद शब्दात न सांगता, प्रांजळपणे सांगाव्यात. कालच्या आणि आजच्या मुलांमध्ये पडलेला आणखी एक फरक म्हणजे, तंत्रज्ञानाची झपाट्याने विस्तारलेली क्षितिजे आणि त्यांचा आपल्या सर्वांच्याच जीवनावर झालेला परिणाम. इंटरनेट, मोबाइल फोन्स आणि माहिती तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्राची परिभाषा बदलून गेली आहे. आपली मुले या तंत्रज्ञानाशी लहानपणापासून परिचित झाली आहेत. त्यामुळे आजची मुले अतिशय सफाईने ते वापरू शकतात. स्वत:च्या ज्ञानात सहजपणाने भर घालू शकतात. यातील काळजीची बाजू ही आहे, की अत्यंत विकृत व घातक गोष्टी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोचत आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीचा वापर नेमका योग्य प्रकारे कसा करावा हे न समजल्याने मुले गोंधळून जात आहेत. नेमकी इथेच पालकांनी त्यांची भूमिका बजावायची आहे. त्यासाठी मुले नेमके काय वाचत आहेत, बघत आहेत याचे पालकांनी भान ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला जे येत नाही, तेही मुलांकडून शिकावे. आजच्या मुलांच्या बाबतीत पडलेला आणखी एक फरक म्हणजे सर्व प्रसिद्धी माध्यमांमधून त्यांच्यावर होणारा हिंसाचार, लैंगिक आशय व चंगळवादाचा भडिमार! अगदी लहान मुलांच्या खेळण्यांपासून व्हिडिओ गेम्सपर्यंत आणि कार्टून्सपासून चित्रपटांपर्यंत. हे सर्व पालक म्हणून आपण थांबवूही शकत नाही आणि बदलूही शकत नाही. पण आपण या सगळ्याविषयी त्यांची मते ऐकू शकतो आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून त्यांच्या मतांना बदलू शकतो.

Scroll to Top