Rakshabandhan
आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. हे सण आपल्यात कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढवतात. अश्याच सणांपैकी एक आहे रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधन हा हिंदू धर्माच्या एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन दिले जाते. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात.
‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत.भारतात भाऊ-बहिणीच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत हे एक अतूट नाते आहे, ज्याची शक्ती रक्षाबंधना निमित्त रेशीमच्या धाग्यात गुंफलेली आपण बघतो. आपण इथे ज्या धाग्याबद्दल बोलत आहोत ती म्हणजे राखी. रक्षाबंधनाच्या विधीनुसार बहीण भावाच्या घरी येते आणि त्याला राखी बांधून तिच्या रक्षणाचे वचन घेते. आजही भारतात लोक हा सण जुन्याच पद्धतीने साजरा करतात. तसे, जर भाऊ आणि बहिणी दूर असतील तर, रक्षाबंधनाला एकमेकांची खुपच आठवण होते. एक काळ असा होता जेव्हा दूरवर संपर्क साधणेही अवघड होते, पण आता काळ बदलला आहे. व्हिडिओ कॉल किंवा इतर गोष्टींद्वारे आपण एकमेकांशी सतत बोलू शकतो.
परंतु आजच्या काळात हा सणाऐवजी व्यवहाराचा व्यवसाय झाला आहे. बहिणी भावाकडून भेटवस्तू म्हणून पैसे मागते. लग्नानंतर सासरच्या मंडळींना भेटवस्तू आणि मिठाई पाठवली जाते. मूल्ये परंपरेची नसून आता व्यवहाराची झाली आहेत. मागच्या वर्षी इतकं दिलं, या वर्षी कमी का दिलं? आज हा सण हिशोबाचे रक्षाबंधन झाला आहे. एवढ्या महागाईत कुठेतरी हा सण भावांना ओझं म्हणून ठरत नाही ना याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आह. संरक्षण आणि इच्छा याच्या पलीकडे जाऊन ते व्यवसायाचे स्वरूप बनत आहे. आज रक्षाबंधनाचा पूज्य इतिहासात पूर्वीइतका दृढ असता तर महिलांवर होणारा अत्याचार व एवढा वाढला नसता गुन्हे वाढले नसते, रक्षाबंधन हा सण केवळ एक दिखाव्याचे स्वरूप न बनता प्रत्येक भावाने फक्त आपल्या बहिणीची सुरक्षा ना करता समाजातील प्रत्येक स्त्रीची बहिणी म्हणून रक्षा करावी असे मला वाटते.
पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची. परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत. आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात. दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला कुरियरने राखी पाठवून देतात. याशिवाय मोबाईल वर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात. स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत. आपण आपल्या पूजा पद्धती मध्ये बदल केलेला आहे. जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाचे तर जुन्या पद्धती अनुसार सण-उत्सव साजरे करायला हवे. रक्षाबंधनच्या पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन हा सण साजरा करायला हवा.
रक्षाबंधन या सणाचे महत्त्व खूप छान समजावून सांगितले आहे.याप्रमाणेच आपले सण आपण पारंपरिक पद्धतीने साजरे केले तर भारतीय संस्कृती टिकून राहील.
Thank you so much