S R Dalvi (I) Foundation

छत्रपती शाहू महाराज 

Chhatrapati Shahu Maharaj

“सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते.”

शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.

धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले.

तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले.

शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासाला गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरी मुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. 

शाहू महाराजांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन. 

Scroll to Top