Role of academically dysfunctional students and teachers
अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे शिक्षण घेताना अडथळा येणे. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी शिक्षणात मागे पडलेले दिसतात. त्यांना लेखन, वाचन, गणिती क्रिया करणे जमत नाही. गडबड, गोंधळ करतात. त्यांना रोजच्या व्यवहारातल्या काही गोष्टी जमत नाहीत. हे विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सुदृढ असतात. मानसिक दृष्टीने मतिमंदही नसतात. परंतु त्यांच्या सर्वसामान्य आकलनात त्रुटी आढळते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षक म्हणून व पालक म्हणून आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले पाहिजे. त्यांची टिंगल न करता त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. अशा विद्यार्थ्यांचे शिकणे हे कंटाळवाणे न होता आनंदाने झाले पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांना शिकवताना तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतला पाहिजे. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहाकडे आणणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षक व पालक ह्यांनी पुढील प्रयत्न केले पाहिजेत.
• अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांचा शोध घेणे व त्यांच्या वर्तनांचा, चुकांचा अभ्यास करणे.
• शिक्षकाने भाषा, गणित व इतर विषयातील समस्या सोडवायला मदत केली पाहिजे. शिक्षकाने अशा विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ दिला पाहिजे.
• शिक्षकाने विद्यार्थ्याशी सहानुभूतीपूर्वक वागावे. त्याला प्रोत्साहन द्यावे. मार्गदर्शन करावे. त्यांच्याकडून अधिक सराव करून घ्यावा.
• विद्यार्थ्यांचे शिक्षण कंटाळवाणे न होता आनंदी कसे होईल ते पहावे. पालकांशी संवाद साधला पाहिजे. शिक्षकाने पालकांना मार्गदर्शन द्यावे. पालक व शिक्षक दोघांनी मिळून विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करावा. आपापसात चर्चा करावी. • एकाग्रतेसाठी मार्गदर्शन अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्याला एकाग्र होण्यासाठी मार्गदर्शन करावे. योगासन, ध्यान इ. मुळे एकाग्रता वाढवण्यास मदत करावी.
• शिक्षकाने विविध पद्धतींचा वापर करून अध्यापन करावे. कृतीद्वारे शिक्षण द्यावे. नाट्यीकरण, प्रभावी कथन इ. पद्धती वापराव्यात. पंचेंद्रियांचा वापर करता यावा यासाठी विविध दृक्श्राव्य साधनांचा वापर करावा.
• अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी हे शारीरिकदृष्ट्या चांगली असतात. त्यांची सर्व विषयांत चांगली व सारखी प्रगती नसते. हे विद्यार्थी जिथे जिथे कमी पडतील तिथे तिथे त्याला मार्गदर्शन करावे. त्यांच्या वाचन, लेखन, गणितीय क्रिया व रोजच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी व गोंधळलेपणा कमी करण्यासाठी शिक्षकाने सतत प्रयत्न करावा.
शिक्षकांनी देखील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्याला अभ्यासात पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. अशा विद्यार्थ्याला वर्गात मागच्या बाकावर न बसवता पुढेच बसवावे. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार अध्यापनात लवचिकता ठेवावी. विद्यार्थ्यांजवळ जे काही गुण असतील त्यांना खतपाणी घालावे. खेळीमेळीच्या वातावरणात शिकवावे. कोणत्या विद्यार्थ्यांत कोणते सुप्त गुण असतील ते सांगता येत नाहीत. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे गुण हेरले पाहिजेत, व त्या गुणांना खतपाणी घातले पाहिजे.