S R Dalvi (I) Foundation

“शिवराम दत्तात्रय फडणीस” लाखो मराठी मुलांना ‘गणित’ शिकवणारा व्यंगचित्रकार

Shi. The. Phadnis: Cartoonist who taught 'Mathematics' to lakhs of Marathi children

“अशीच आमुची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती,” असे हे श्रवणीय गीत आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. त्यामध्ये थोडासा बदल करून म्हणावेसे वाटते “अशीच आमुची सुंदर, रंगीत, चित्रमय गणिताची पुस्तके असती, आम्हीही गणितज्ञ झालो असतो.” निदान त्याकाळी माझ्या बालपणी पास होण्यापुरते 35 गुण तरी मिळाले असते..

त्याकाळी बालभारती (सरकारी) नव्हते. त्याचा डोलारा सांभाळणारे अधिकारी शंकर पाटील वा गणित समितीचे अध्यक्ष डॉ. फडणीस व सभासद प्राध्यापक राईलकर हेही नव्हते. त्यासाठी 1976 साल उजडावे लागले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात गणिताचे पहिलीचे पुस्तक सचित्र असावे असा साक्षात्कार झाला आणि वरील तीनही जाणत्या प्रभूतींच्या गळ्यात पहिलीचे गणिताचे पुस्तक सचित्र निर्मिती करण्याची माळ घालण्यात आली आणि ते धनुष्य त्यांनी लीलया एका अद्भुत चित्रकाराच्या सिद्धहस्ते सहज पेलले.

शि. द. फडणवीस

गणित हे एक शास्त्र आहे ते समजण्यास गुंडाळीच्या अस्ताव्यस्त झालेल्या धाग्याचे टोक शोधण्यापेक्षाही कठीण, बोजड असा सर्व विद्यार्थ्यांचा परंपरागत झालेला समज.

लहान मुलांना सोप्या चित्र माध्यमातून रंग, प्रतीकं, दृष्टांत यांचा वापर करून सोप्या चित्रकृतीतून पुस्तक विद्यार्थ्यांचा हातात ठेवण्यात आले. त्यापूर्वी अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागले. अशी तयार झालेली पहिलीची पुस्तके चाचणी म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक शाळांत पाठविण्यात आली.

वर्षभर शिक्षक, पालक, तज्ज्ञ व मुलांच्या अनुभवातून मिळालेल्या सूचनेप्रमाणे योग्य ते बदल करून, हास्य चित्रांचा वापर करून तयार केलेले पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येकाने शाळेत 1978 साली सरकारी निर्मिती असल्याचे शर्ती, अटी यांच्या चौकटीत राहून शिक्षणतज्ज्ञ व सर्व जिल्ह्यातून निवडलेल्या शंभर शिक्षकांच्या समीक्षा समितीची अडथळ्यांची शर्यत पार करून डोंगरकपारीतील शाळांमधून ते शहरातील बहुमजली इमारती मधील विद्यार्थ्यांच्या मानसितेचा विचार करून झाडे-फुले-फळे, माणसे प्राणी इत्यादींचे सोपे-सोपे वाटणारे आकार तयार केले गेले.

पुस्तकावर सकारात्मक अभिप्रायांचा सर्वतोपरी वर्षाव झाला. त्याचा परिणाम म्हणजे 35 लाख पुस्तकांची पहिली आवृत्ती, आठ भाषांमध्ये भाषांतर झाले आणि त्या हास्यचित्रकाराला त्याच्या अद्भुत चित्रांची पोहोचपावती म्हणून आणखीन चार इयत्तांच्या गणिताच्या पुस्तकांची सचित्र निर्मिती करण्याचा बोनस मिळाला.

कालांतराने सरकारी पाठ्यपुस्तक मंडळाची ती सर्व पुस्तके प्रकाशित झाली, सर्वमान्य झाली म्हणून ती बहुरंगी करण्याचा मानही त्याच हास्यचित्रकाराला मिळाला.

अशी मौलिक कामे करणाऱ्या हास्यचित्रकाराचे नाव म्हणजे शि. द. फडणीस (शिवराम दत्तात्रय फडणीस).

सरकारी काम करताना अनेक समित्या असतात. तसेच या पुस्तकांच्या वेळीही समिती होती.

या सरकारी लोकांची बुद्धिमत्ता किती वेगळ्या प्रकारची असते याचा किस्सा शि. द. सांगतात, “गणित समितीने मंजूर केलेले मुखपृष्ठ समीक्षा समितीने नामंजूर केले. कारण तीन भागांमध्ये कथा चितारली होती, वजाबाकी दाखवण्यासाठी पहिल्या भागात शेतकऱ्याच्या डोईवरच्या टोपलीत चार आंबे घेऊन चाललाय, दुसऱ्या चित्रात झाडावरचा वानर एक आंबा वरच्यावर उचलतो, तिसऱ्या चित्रात टोपलीत तिचं आंबे राहिले आहेत, वजाबाकी झाली, समीक्षा समितीने अभिप्राय दिला. चित्र छान आहे पण मुलांना चोरीचा संदेश दिला जातो त्याचे का?? आता बोला.

बालपणापासून ते मूल 16-17 वर्षांचे होईपर्यंत जे संस्कार घरातून, समाज वर्तुळातून त्याच्यावर होतात ते त्याच्या रक्तात कायमचे भिनले जातात. 29 जुलै 1925 रोजी असंख्य बाळे जन्माला अली असणार परंतु त्यापैकी बेळगाव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भोज या गावात जन्मलेल्या बाळाच्या कपाळावर सटवाईने रेषा मारल्या असणार भविष्यात ‘रेषाटन’ करण्यासाठी. बालपणीची काही वर्षे भोज गावच्या मातीत घालवल्यानंतर पालकांनी शि. द. यांना शालेय शिक्षणासाठी कलापूरला (कोल्हापूरला) पाठविले.

कलापूर कलेचे माहेरघरच. पहाटेच्या दिशा फाकायच्या त्या सुप्रसिद्ध गायकांच्या तान-आलापाने, आंबामातेच्या गर्भगृहातील घंटानाद म्हणजे म्हणजे साक्षात देवीचा आशीर्वाद. रंकाळा तलाव म्हणजे मानसिक शिरता व समाधानाचे प्रतीकच.

गावरान साधीभोळी माणसे त्यामध्येच वावरणारे आपल्या कलेचा अविष्कार ईश्वराचा प्रसाद म्हणून प्राशन करणारे कलामहर्षी बाबुराव पेंटर,बाबा गजबट, गणपतराव वडणगेकर, आबालाल रहिमान अशा शतप्रतिशत कलाकारांच्या कलेच्या तेजाने संपूर्ण कलापूर न्हाऊन निघत होते. त्याच तेजाचे काही कवडसे ओंजळीत पकडल्याने काळजात चित्रकार होण्याची उर्मी दाटून यायला लागली.

चित्रकलेची गोडी असलेल्या समविचारी मुलांना घेऊन शि.द. रंकाळा, मंडई इत्यादी ठिकाणी स्केचिंगसाठी भटकू लागले. त्यामध्ये वसंत सरवटेही असायचे. ते त्यांचे खास मित्र ज्यांनी शि. दंची साथ कधीही सोडली नाही.

आपल्याला भावेल अशा प्रसंगाचे चित्रण वा चित्रमालिका तयार करणे हा शि. दं.चा छंद होता. मॅट्रिकची शिक्षण पूर्ण झाले. मुंबईमध्ये सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये जाण्याचा हट्ट त्यांनी आपल्या आण्णा काकांकडे धरला. लहानपणीच त्यांचे वडील दिवंगत झालेले.

नऊ भावंडांमध्ये शेंडेफळ म्हणून तोही हट्ट अण्णांनी पूर्ण केला. जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये उपयोजित कला (कमर्शियल आर्ट) या शाखेत प्रवेश घेतला.

मुंबईत नातेवाईकांकडे विंचवाचे घर पाठीवर या म्हणीप्रमाणे राहण्याच्या जागा सतत बदलत चार वर्षांचा डिप्लोमा मिळविला त्याच काळात निसर्गचित्रे, स्केचिंग हे सर्व करणे सुरूच ठेवले. अर्धवेळ नोकरीही केली.

शि. द. फडणीस

जी. डी. आर्ट ही पदविका मिळाल्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या दिवाळी अंकांसाठी व्यंगचित्र पाठवण्याचे काम तसेच जाहिरात सासनतेसाठी जाहिराती तयार करण्याचीही संधी सोडली नाही.

त्याकाळच्या सुप्रसिद्ध हंस मासिकाने विनोद विशेषांकासाठी व्यंगचित्र स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेत शि. द. ना व्यंगचित्रांसाठी बक्षीस मिळाले. हंसचे संपादक अनंत अंतरकर यांचा त्यानिमित्ताने परिचय झाला. शाळेमध्ये असताना कलाशिक्षक शिंदे मास्तरांनी जसा त्यांच्या पाठीवर हात ठेवला त्याच प्रकारे अनंत अंतरकरांनी दिलेले प्रोत्साहन शि. दं.ना हास्यचित्र निर्मितीसाठी टॉनिकच ठरले.

त्या दोघांचे वैयक्तिक व व्यावसायिक नाते एवढे दृढ झाले. ज्या वेळी अंतरकरांनी आपला व्यवसाय मुंबईहून पुण्याला हलवला त्याचवेळी शि. द. फडणीसांनी प्रकृतीच्या कारणास्तव मुंबई सोडून कोल्हापूर गाठले. अशावेळी अंतरकर शि. दं.च्या हास्य चित्रांच्या प्रेमात बुडाले होते. त्यांनी शि. दं.ना पुण्यात वास्तव्यास बोलावले.

एखाद्याकडे उत्तम कलागुण असून जोपर्यंत त्याच्या गुणांची कदर करणारा त्यांना योग्य व्यासपीठ देणारा कोणी भेटत नाही तोपर्यंत त्या कलाकाराच्या अंतर्गत गुणांची एखाद्या चोळामोळा करून कोपऱ्यात टाकलेल्या कागदाच्या तुकड्याप्रमाणे अवस्था होते. याबाबतीत शि. द. नशीबवान ठरले. त्यांना अनंत अंतरकरांसारखा ‘गॉडफादर’ ठरला.

70 ते 90 ही दशके मराठी साहित्य, कला क्षेत्राच्या सुवर्णकाळच. नासी फडके, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वि. वा. शिरवाडकर असे अनेक नामवंत साहित्यिक, रघुवीर मूळगांवकर, दीनानाथ दलाल, एस. एम. पंडित इत्यादी कलारसिकांवर अधिराज्य गाजविणारे चित्रकार, अभिजात ठेवणीतले मराठी चित्रपट, लता-आशा, सुमन कल्याणपूरकर, सुधीर फडके, सी. रामचंद्र, पं. भीमसेन जोशी अशी संगीतामधली माणिक मोती, काशिनाथ घाणेकर, राजा परांजपे, रमेश देव, सुलोचना, जयश्री गडकर, चंद्रकांत सूर्यकांत मांढरे अशा अनेक मातब्बर कलावंतांनी स्वकलेच्या तेजाने मराठी मन उजळून निघाले आहे,.

स्वप्रकाशाने तेजाळणाऱ्या तारांगणात शि. द. फडणीस नामक निःशब्द हास्यचित्रकाराने आपल्या अचाट कल्पनाशक्तीच्या जोरावर विहार करायला सुरुवात केली.

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी सुंदर ललना, नाट्य तारका यांची वास्तववादाला जवळीक साधणारी चित्रे चितरित पण अनंत अंतरकरांनी ही पायवाट पुसून तिलाच व्यंगचित्रांची दुसरीच वाट जोडली.

हास्यचित्र वापरण्याचा मुखपृष्ठावर झालेला पहिलाच प्रयोग शि. द. फडणिसांच्याच सिध्दहस्तामधून तडीस गेला.

हंसच्या विशेषांकाचे मुखपृष्ठ शि. द. यांनी हास्यचित्र वापरून केले. हे शि. दं.चे पहिले बहुरंगी मुखपृष्ठ याचीच पुनरावृत्ती करण्याचे ठरवून अंतरकरांनी त्यांच्या मोहिनी या दिवाळी अंकावर हास्यचित्र छापण्याचे धाडस केले.

बस स्टॉप असून बससाठी रांगेत एक पुरुष ज्याच्या शर्टवर उंदीर चित्ररूपात आहेत तर त्याच्याच बाजूला उभ्या असलेल्या स्त्रीच्या साडीवर उडी मारण्याच्या आवेशात मांजरे आहेत. बाजूच्या पुरुषाच्या नजरेत ती मांजरे उडी मारतील का? असा भाव आहे त्यामुळे तो माणूस घाबराघुबरा होतो.

ही कल्पना सर्वतोमुखी झाली. आणि ते चित्र शि. दं.चे बोधचिन्हही झाले. सकाळ दैनिकाने त्याचे कौतुकही केले. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर हास्यचित्र वापरण्याची 1952 ची पायवाट आज हमरस्ता झाली आहे, मोहिनीच्या प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ गेली 50 वर्षांच्यावर आजपर्यंत शि. दं.च्या कुंचल्यातून उतरते. हे एक रेकॉर्ड आहे.

त्यांनी अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे स्वहस्ते सजविली आहेत. टीका टिपणी, व्यंग दाखवणे, सणसणीत कोरडे ओढणे, व्यंगचित्र म्हणजे समाजाचा आरसा, समाज प्रबोधन, चुकलेल्याला सरळ मार्गावर आणणे इत्यादी सर्वसाधारण राजकीय व सामाजिक व्यंगचित्राचे गुणधर्म शि. द. फडणीसांच्या हास्यचित्रांमध्ये आढळणार नाहीत.

केवळ मनोरंजन करणे, विरंगुळा म्हणून चित्रांचा आस्वाद घेणे एवढा त्यांच्या चित्रांचा माफक हेतू. त्यांच्या चित्रांचे महत्वाचे अंग म्हणजे शब्दविरहित रचना, कल्पना इतकी बोलकी असते की पाहताक्षणी आपले ओठ सहज रुंदावतात.

डॉक्टर आणि म्हैस या चित्रात म्हशीची शिंगे वरच्या बाजूस वळलेली. त्यांच्यामध्ये डॉक्टरचे डोकं दोन्ही कानांमध्ये शिंगांची टोके गेलेली स्टेथोस्कोपसारखी शेपटीचे टाके, स्टेथस्कोप लावल्याप्रमाणे. संपूर्ण रचना अशी केली आहे की शेपटी आणि शिंगांचा स्टेथोस्कोप वाटतो.

दररोज दूध घालणारा भैया आणि माणसाऐवजी दूध घ्यायला भांडे घेऊन आलेले मांजर. दुधासाठी लंपट असलेले मांजर कोणताही संदेश टीकाटिपणी नाही. केवळ हास्य मनोरंजन.

भारतीयांनी निर्माण केलेल्या कलाकृतींवर युरोपियन किंवा पाश्चिमात्य देशांच्या कलेचा प्रभाव आढळतो. पेंटिंग असो वा व्यंगचित्रकला त्या-त्या परदेशी कलेकडून प्रेरणा घेतलेली आढळते. फक्त काही मिनिएचर पेंटिंग सोडून परंतु वारली चित्रकला ही मात्र अस्सल भारतीयच.

बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्मण यांची प्रेरणा म्हणजे युरोपियन व्यंगचित्रकार डेव्हिड लो. मी स्वतः जॅक डेव्हिस आणि डी. लिव्हाईन यांच्या व्यंगरचित्र आणि अर्कचित्रांनी प्रभावित झाले.

त्याचप्रमाणे शि. द. फडणीशी त्यांचा आवडता चित्रकार पिकासो यांच्या क्युबिझम शैलीने प्रभावित झाले. त्यांची चित्रे क्युबिकल अनेक कोण असलेली आढळतात. त्यांच्या रंगीत चित्रांना आउटलाईन नसते.

आल्हाददायक रंगसंगती, रंगांमध्ये साधलेले पर्स्पेक्टिव्ह, रचना, हावभाव यांची योग्य संगती आढळते. त्यांच्या रेषा घाईगर्दीत पळत नसतात तर डौलदार पद्धतीने कागदावर मोहक पद्धतीने फेर धरतात.

म्हणून त्यांची चित्रे 60-70 वर्षे झाली तरी पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात त्यांच्या कलात्मकतेचा आस्वाद घ्यावा वाटतो.

अनेकजणांचा असा समज आहे की शि. द. फडणीस राजकीय व्यंगचित्रकलेपासून चार हात दूरच राहिले. परंतु त्यांच्या भूतकाळात डोकावले तर 1965 च्या दरम्यान त्यांची राजकीय व्यंगचित्रे साप्ताहिक सोबत, केसरी, तरुण भारत, यामध्ये प्रसिद्ध झालेली होती. परंतु त्यामध्ये ते रमले नाहीत. त्यांच्या मते टीकात्मक व्यंगचित्रे काढणे हा त्यांचा पिंड नाही.

हळूहळू ते हास्यचित्रांकडे वळले. ज्याकाळात त्यांनी राजकीय टीकात्मक व्यंगचित्रांची निर्मिती थांबविली. त्याच काळात सामाजिक, राजकीय व आर्थिक उलथापालथ होत होती. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे रोखठोक विचार मांडणारे सरकारला हलवणारे अन्य कोणी नसताना शि. द. फडणीसांनी राजकीय व्यंगचित्रे काढणे थांबविणे यामुळे राज्याचे, मराठी लोकांचे आणि व्यंगचित्रकलेचे नुकसान झाले असावे असे वाटते.

ज्या-ज्या वेळी देशासमोर समाजावर संकट उभे ठाकले अशावेळी साहित्यिक वा कलाकारांनी व्यापक हित लक्षात घेऊन आपापली शस्त्रे अस्त्रे यांचा जरूर वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ आणीबाणीचा काळ.

आजच्या पिढीला शि. द. हे हास्यचित्रकार आणि लेखक एवढीच माहिती असणार. या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या भूतकाळात प्रवास करताना ते एक हरहुन्नरी कलावंत, तंत्रज्ञ आणि उत्तम जाहिरातकारही होते हे आढळले.

त्यांच्या ‘हसरी गॅलरी’ या हास्यचित्रांच्या प्रदर्शनासाठी त्यांनी फोल्डिंगचे डिस्प्ले करण्यासाठी पार्टीशन स्वतः अनेक तांत्रिक बाजू सांभाळून केले. म्हणजे चलती-फिरती गॅलरीच! लोकांना प्रात्यक्षिक देण्यासाठी गावोगावी ने-आण करण्यासाठी फोल्डिंगचा एक विशिष्ट पत्रा वापरून बोर्ड तयार केला.

प्रात्यक्षिक देताना जाडजूड फटकारे मारण्यासाठी त्यांनी असे फाउंटन पेन तयार केले की त्या फटकाऱ्याची जाडी अंगठ्याच्या जाडी एव्हढी असायची. त्याचप्रमाणे संपूर्ण सभागृहातल्या शेवटच्या माणसालाही ते प्रोजेक्ट करीत असलेल्या हास्यचित्रांचा आस्वाद घेता यावा यासाठी चित्र 9 ते 10 फूट मोठे दिसण्यासाठी स्वतः एक एन्लार्जर तयार केला.

ऑफसेट प्रिंटिंग यायच्या आधी ट्रेडल मशीनवर प्रिंटिंग व्हायचे. मेटलचे ब्लॉक तयार करून त्यावर छापणारी प्रतिमा उठवावी लागे. यासाठी रंग वापरायला बंधने होती. एक कलर, दोन कलर, ते चार कलरचे प्रिंटिंग व्हायचे. किती रंग वापरले यावर किंमत ठरायची. शि. द.ची चित्रे फ्लॅट रंगाने प्रिंट केलेली आढळतात. त्याला हेही एक कारण असावं.

जाहिरातीचे काम करतांना प्रेस ॲड्स, फोल्डर, पोस्टर इत्यादींची त्यांनी अनेक वर्षे निर्मिती केलेली आहे. हे मलाही माहित नव्हते. त्यासाठी डिझाईनिंग, संकल्पना, आर्टवर्क, प्रिंटिंग व शेवटी ग्राहकाकडे ते पोहोचवणे अशी सगळी अत्यावश्यक कामे 6-10 चित्रकारांच्या मदतीने केली गेली. हेही अचंबित करणारे.

शि. द. फडणीसांनी अनेक गंभीर, क्लिष्ट, दुर्बोध, रुक्ष विषय असलेली पुस्तके आपल्या अचाट कल्पनेच्या जोरावर ती पुस्तके सुबोध आणि रंजक केली.

‘ज्युव्हेनाईल जस्टीस ॲक्ट -1986- अनाथ भटकी, टाकून दिलेली, गुन्हेगारीकडे वळलेली मुले यासंबंधी विवेचन ‘पीएल द वे फॉर पॉजिटीव्ह लिव्हिंग’ व्यवस्थापन कारखान्यात समाजातील कारखान्यातील पर्यवेक्षण संस्कृत, मराठी, इंग्रजी भाषेत रिटायर इन हार्मनी ज्येष्ठांच्या समस्या व त्यावर तज्ज्ञांचे विचार यातील एक हास्यचित्र पहा – मोठ्ठा टीव्ही, त्यांच्या बाजूलाच म्हातारी व्यक्ती हात-पाय दुमडून जिवंत झोपली आहे. या चित्रातला पंच असा आहे.

त्या टीव्हीच्या स्क्रीनवर अनेक खोडकर मुले असून एक मुलगा स्क्रीनच्या हात बाहेर काढून टीव्हीचा आवाज मोठ्ठा करतो.

अशाप्रकारे अचंबित करणारी अनैसर्गिक, काल्पनिक प्रसंग घटनांची व्यापलेली शि. द. यांची हास्यचित्रे आहेत.

जाहिरात क्षेत्रात अनेक वर्षे इलस्ट्रेटर म्हणून काम केल्याने असे आढळले की जे सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे त्या शोधून काढा व त्याचा वापर जाहिरातीत करा.

वाचकांची पहिली नजर ती रचना खिळवून ठेवील आणि जाहिरात मनाचा ठाव घेईल.

शि. द. फडणीस

शि.द. कमर्शिअल आर्टिस्ट जाहिरातीच्या भाषेत बोलायचे तर ‘व्हिज्युअलाईझर-कम-इलस्ट्रेटर’ होते. त्यामुळे त्यांना लोकांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे याचे पूर्ण ज्ञान होते. त्यांची अनेक हास्यचित्रे जाहिरातींसाठी वापरण्याजोगी आहेत.

कल्पनातीत आणि अघटित, विरोधाभास साधे साधे विषय घेऊन केलेली. त्यामध्ये व्यंग, विसंगती, अतिशयोक्ती (विचारांची अतिशयोक्ती) टीका यांचा समावेश क्वचितच आढळतो.

एखादी सुंदर ललना आपल्यासमोरून येत असेल व आपल्याला क्रॉस करून पुढे गेली तर आपण अचानक अचंबित होऊन मागे वळून न्याहाळतो. तीच क्रिया शि. द. यांच्या चित्रांच्या बाबतीत घडते.

ते एखादा कल्पनातीत आकार, घटक त्या हास्यचित्रांमध्ये गुंफतात की आपल्या तोंडून (अरे व्वा) असे उद्गार बाहेर पडतात आणि खुद्कन हसू येते.

उदाहरणार्थ आईच्या मायेने स्तनपान करणारे झोपलेले मांजर, तिची दूध पिणारी चार पिल्ले त्यामध्ये दूध पिणारे उंदराचे पिल्लू. त्या पिळणे त्या रचनेचा अर्थच बदलला. इथे घडणारी घटना, रेखीव रेषा आणि त्या चित्राचा मूड पाहून सहज हास्य फुलतं.

दुसरे उदाहरण चांदण्यारात्री होडीतून तळ्यात विहार करणारे तरुण जोडपे छान रेखांकन आणि रंगसंगती, बायकोच्या पदराचे केलेले शिड ही कल्पनाच भन्नाट. शि. दं.च्या कल्पनेचा विस्तार, सूर्यालाही अचंबित करतो. उडणारी छोटी परी, उष्णेतेन फणफणलेल्या सूर्याला पंख्याने वारा घालते.

ते उत्कृष्ट वास्तववादी चित्रकार आहेत याची कित्येकांना पुसटशीही कल्पना नसेल.

त्यांच्या हास्यचित्रांच्या यशात त्यांच्या कल्पनांचा जेवढा वाटा आहे तेवढाच वाटा त्यांनी निवडलेल्या चित्रांकनाच्या स्टाइलचाही आहे. गुरगुरुन अंगावर न येणारी रंगसंगती, साधारण भौमितिक आकार, गोलाकार रेषा, विषयानुरूप हावभाव अशा प्रकारे सर्व घटक जुळल्याने त्यांच्या स्टाईलला कोणीही प्रतिस्पर्धी नाही.

पहिलीच्या मुलांसाठी त्यांच्या वयानुरूप किती सोपी साधी कल्पना ते मांडतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक छोटुकली दोन भागात चितारलेली आहे.

एका भागात हिरव्या आणि गुलाबी रंगाची सात भांडी एकावर एक त्या मुलीने रचलेली आहेत आणि दुसऱ्या भागात तीच छोटुकली त्या रचलेल्या भांड्यातील पाच गुलाबी भांडी खाली पाडते आणि होते वजाबाकी.

हसरी गॅलरी हे हास्यचित्रांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके यांचा कार्यक्रम 1965 साली लोकांसमोर मांडला गेला. स्वतः तयार केलेल्या फिरत्या गॅलरीतून तो कार्यक्रम देशाच्या शहरांपासून ते दुर्गम भागांपर्यंत पोहोचवला शिवाय परदेशातही त्याचे प्रयोग केले गेले.

लाखो लोकांनी त्याचा आस्वाद घेतला त्याच बरोबर चित्रहार हा कार्यक्रम प्रात्यक्षिके आणि स्लाईड शो अनेक ठिकाणी आयोजित केले गेले. यासाठी त्यांच्या बायकोने सौ. शकुंतला यांनी जे परिश्रम आणि प्रत्यक्ष भाग घेऊन नवऱ्याला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी स्वतः शिडीची भूमिका बजावली त्याला शि. दं. यांच्या प्रवासात अनन्य साधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या दोन्ही मुलींची साथही त्यांच्या यशाचा भाग आहे.

त्यांच्या कलागुणांची दखल अनेकांनी घेतली. ‘कॅग’ भारतातल्या अग्रगण्य संस्थेने मोहिनी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला ‘लक्षवेधी मुखपृष्ठाचा’ पुरस्कार दिला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट बंगळुरू या संस्थेने जीवन गौरव पुरस्काराने गौरविले. सौ. शकुंतला व शि. द. यांना 2018 साली मुकुंद गोखले स्मृती यशवंत वेणू अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. असे अनेक पुरस्कार हास्य चित्रांच्या बादशाहला मिळाले.

हसरी गॅलरी, मिस्कीत गॅलरी, चिमुकली गॅलरी व छोट्यांसाठी चित्रकला अशा अनेक पुस्तकांच्या निर्मात्याच्या 98 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या कोटी कोटी शुभेच्छा!

“जो न देखे रवि, वह देखे शि. द.”

Scroll to Top