S R Dalvi (I) Foundation

शाळेत गप्पांचा तास असायला हवा का?

Should the school have a talking period?

मुलांना आपल्या वर्गसोबत्यांबरोबर, इतर दोस्तमंडळींसोबत गप्पा मारायला आवडते. वर्गात मोकळा वेळ मिळाला, की आवाज सुरू. घरातही मुलाला भावंडं, आई-वडील यांच्याशी बोलायचे असते. मग वर्गात शिक्षक व घरात पालक दटावतात, ‘अरे, किती बोलतोस? थोडं गप्प बसायला काय घेणार?”

खरंतर मुलांना बोलू द्यायला पाहिजे. आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर त्यांनी गप्पा माराव्यात, मग त्या एखाद्या चित्रपट, हॉरर शो किंवा मालिकेविषयी असतील, वाचलेल्या पुस्तकावर असतील, गेम्स, मित्र-मैत्रिणी किंवा घरातल्या विषयांवर असतील. मुलांच्या गप्पा ऐकल्या, की आपल्याला कळते त्यांना बढाया, थापा मारायलाही आवडते. त्यांच्या बालसुलभ भन्नाट कल्पनाही जादूसारख्या वाटतात; परंतु मित्र-मैत्रिणींशी खूप बोलल्यावर त्यांना जो आनंद मिळतो तो आगळाच असतो. 

लहान वयात जेवढी म्हणून मुले एकत्र खेळतील, गप्पा मारतील तेवढे चांगले. मनाची चांगली बैठक घडण्यासाठी संवादातून अभिव्यक्ती होणे गरजेचे आहे. कारण आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याला खूप मोकळे वाटते, असा प्रत्येकाचाच अनुभव आहे. मुलांना घरात आई-वडिलांबरोबर बोलायचे असते, तेव्हा त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी वेळ ठेवावा. मुले जो आपल्याशी जो संवाद साधतात त्यातून त्यांच्या भावना, समज, त्यांचे मित्र, शाळा, अभ्यास याविषयी कळते, त्यानुसार त्यांच्याशी बोलून योग्य विचारांचे संस्कार ठसवता येतात. वाईट गोष्टींना, विचारांना चांगल्या शब्दांनी समजावून वेळीच आवर घालता येतो. 

शाळेत अध्ययन-अध्यापनात मुलांना जास्तीत बोलण्याची संधी द्यावी. त्यामुळे विषय संकल्पना त्यांना चांगल्या समजतात. शिक्षकांनी मुलांशी सतत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन करावे. अशा प्रकारे पालक, शिक्षकांशी संवाद साधून मुलाला भावनिक आधार मिळाला पाहिजे. आज गप्पा मारायला मुलांना फारसा वेळ मिळत नाही. अभ्यास, ‘छंदवर्ग, टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन यांत वेळ जातो. त्यामुळे मुले जणू संवाद विसरतच चालली आहेत. म्हणूनच मुलांनी समवयस्क मित्रांबरोबर गप्पा माराव्यात. मुले जेवढे म्हणून व्यक्त होतील तेवढ्या मोकळ्या मनाने राहतील. मित्रांशी, घरातल्यांशी बोलल्यानंतर रात्री मुलांना शांत झोप लागते. घरातल्या मोठ्यांबरोबरचा संवाद म्हणजे त्यांना कायम उपदेशात्मक जाच वाटतो. त्यामुळे ते कंटाळतात. एका समवयस्क मित्रासारखा, हसता-खेळता संवाद आई-वडिलांना मुलांशी करता आला, तर ते एक मोठे कौशल्य असेल. त्यामुळे मुलांना तणाव राहणार नाही. स्वमग्नतेतून बाहेर पडून ते व्यक्त होतील.

मुलांमध्ये आजकाल दिसणारी नैराश्याची वृत्ती कमी होऊन संभाषणकौशल्य वाढेल. चार लोकांत बोलण्याची सवय लागेल. त्यातूनच आपोआप सामाजिक समायोजन साधले जाईल. लिहिता येते; पण बोलता येत नाही, अशी परिस्थितीत आज आपल्याला मुलांची दिसते. लहानपणापासून संवाद-अभिव्यक्तीतून ती कला विकसित झाली तर चांगलेच. आपले म्हणणे प्रभावीपणे मांडण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होतो. मुलांचं भावविश्व, अनुभवविश्व हेच त्यांच्या शिकण्याचं साधन बनलं पाहिजे. 

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण जास्तीत जास्त आनंददायी व्हावं,म्हणून प्रत्येक शाळेत गप्पांचा तास असायलाच हवा.

Scroll to Top