To talk or not to talk!!
यंदाची दिवाळी गावी झाली. गावाकडून मुंबईला परत येत होतो आमच्या सोबत लेक्चरर असलेले आमचे मामा ही होते. बसमध्ये ड्रायव्हर केबिनच्या मागे असलेल्या तीन आसनी आम्हाला जागा मिळाली. तशी फार गर्दी नव्हती, ऐसपैस बसलो. थोड्या वेळाने मामाच्याच काॅलेज मधील इंग्रजीचे सिनिअर प्राध्यापक आले, विशेष म्हणजे ते स्वत:ला नेहमी प्रोफेसर असंच म्हणवून घेत. प्राध्यापक म्हटलेलं त्यांना आवडत नसे.
प्रोफेसर आमच्या बाजूला बसले. बस आता बऱ्यापैकी भरली होती. समोरच्याच सीटवर एक शेतकरी बाबा बसले होते, डोईवर पांढरे पागोटे, कपाळावर बुक्का. बहुतेक ते आपल्या मुलीला सासरी सोडायला जात असावेत. वेळ झाली तशी बस सुटली.
प्रोफेसर आणि मामाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. माझ्याकडे हात दाखवून मामा प्रोफेसर सरांना म्हणाले – ” सर, हा माझा भाचा…हा देखील एकेकाळचा तुमचा विद्यार्थी आहे बरं का ..”
प्रोफेसर – ” अच्छा … आता हा कुठे असतो?.. काय करतो ??”
मामा – ” हा एका कंपनीत काम करतो..”
आम्ही काॅलेजात शिकत असताना हे प्रोफेसर अथेल्लो, मॅक्बेथ वगैरेवर असं काही बोलत की जसं काही अख्खा शेक्सपिअर कोळूनच प्यालेत हे..
मामाकडे पाहून प्रोफेसर यांनी लगेच एक शाब्दिक कोटी केली – म्हणाले – ” सर, कंपनीत काम करणाऱ्या लोकांची कमाल आहे बरं का, अहो ही मंडळी शिफ्टमध्ये काम करता करता आपली स्वप्नं देखील शिफ्ट वाईज ॲडजस्ट करतात बरं का…” स्वत:च्या बोलण्यावर ते स्वतःच हसले..
समोरचे शेतकरी बाबा आमचं बोलणं ऐकत होते. त्यांच्याकडे पहात प्रोफेसर बोलले – ” सर, ही शेतकरी मंडळी सगळ्यांत सुखी बरं का, निवांत असतात ह्यांना स्वप्नं पहाण्याची गरजच नाही..”
शेतकरी बाबा कसंनुसं हसले, म्हणाले – ” साहेब, स्वप्नं पडायला झोप यावी लागते.. तुमचं बरं आहे, तुम्हाला झोप येते तरी लागते. आम्हा लोकांना काळजीनं झोप येतच न्हाई बघा दुबार पेरणी, तिबार पेरणी, खराब बियाणं, अतीवृष्टी, अवकाळी पाऊस, कर्ज...कशी झोप येईल साहेब ?? सोयाबीन भिजलं, कापसावर कीड पडली, तुर जळून गेली..कसला निवांतपणा – कुठली स्वप्नं पडणार ??..आमचं ही तुम्हां लोकांसारखं ” दिन जाव – पैसा आव ” असं असतं तर लै बेस्ट झालं असतं.. स्वप्नंच स्वप्नं पाहिली असती..”
शेतकरी बाबांचे बोल – जणू चक्क लोखंडी नांगराने नांगरणीच..
प्रोफेसरांचा आता मात्र हॅम्लेट झाला होता …..त्यांना प्रश्न एवढाच पडला होता की आता बोलावं की बोलू नये !!