S R Dalvi (I) Foundation

तुझं आहे तुजपाशी…

Tujh aahe tujhpashi…

प्रत्येकजण आनंद शोधण्यासाठी धडपडत असतो. काही लोक गेम खेळण्याचा आनंद घेतात. काहींना खाण्यापिण्यातच आनंद मिळतो. काहींना गाण्याचा आनंद मिळतो. काहींना वाचनाचा आनंद मिळतो. काही लोक पैशाच्या माध्यमातून आनंदाचा पाठलाग करतात, असा विचार करतात की पैसा मिळवल्याने त्यांना आनंद मिळेल. सचिन गौरवास पात्र आहे. वर्षभरात त्याला सर्व बाजूंनी प्रसिद्धी, प्रशंसा आणि पैसा येतो. हे पाहून अनेकांना सचिन तेंडुलकर बनण्याचे स्वप्न पडत असते.

टेलिव्हिजनवरील लिटिल चॅम्प्स गाण्याची स्पर्धा वणव्यासारखी रंगली, प्रेक्षक पुढचा मोठा विजेता कोण असेल हे पाहत होते. त्यानंतर शेकडो गल्लोगल्ली गाण्याचे क्लास सुरू झाले आणि पालकांनी आपल्या मुलांसह या वर्गांच्या दारात रांगा लावल्या. अनेकांनी आपल्या बाळाला दूरदर्शनवर पाहण्याचे स्वप्न पाहिले. प्रत्येकाला यशस्वी, प्रसिद्ध आणि मोठे व्हायचे असते.पण हे काही खरे नाही. कारण या धडपडीत बहुसंख्य लोकांच्या वाट्याला निराशा, दुःखच येते. आपले कुठे चुकले हे शोधण्याची तसदीही कोणी घेत नाही. आनंद आपल्या आजूबाजूला आहे, जर आपण त्याचा शोध घेतला तर.

असे होते की आपले डोळे बाहेरचे जग पाहतात. त्या डोळ्यांना आपल्या मनात काय चालले आहे ते समजू शकत नाही. ते इतर लोकांचे चेहरे पाहू शकतात, परंतु त्यांचे स्वतःचे नाही. म्हणूनच आपण इतरांकडे बघण्यावर अवलंबून राहतो. मग समोरच्या व्यक्तीमध्ये काय आहे ते आपण शोधू लागतो. आपल्याला तेच अपेक्षित असते जे समोरच्या व्यक्तीमध्ये आहे. त्यातूनच दुःखे निर्माण होतात; हेवेदावे, असूया, हाव, स्पर्धा, लबाड्या, फसवाफसवी या अपप्रवृत्ती निर्माण होतात.संतांनी याचसाठी खूप खूप पूर्वीच सांगून ठेवले आहे – तुझं आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलाशी।।

संत सांगतात का, प्रथम स्वतःकडे पाहा. नजर अंतरात्म्याकडे वळवा, आपण कोण आहोत, कसे आहोत, आपल्याकडे कोणकोणते गुण आहेत, त्यातले मजबूत कोणते, दुबळे कोणते या सगळ्यांचा विचार करा. ‘मी सचिन होईन’, ‘मी अमिताभ बच्चन होईन’ असे म्हणण्यापेक्षा “मी ‘मी’ होईन” असे म्हटले पाहिजे.
सचिनला स्वतःचे सामर्थ्य कशात आहे हे कळले आणि तो भारतरत्न बनला, लताबाईंना आपले गुण कोणते हे कळले आणि त्या मोठ्या झाल्या, आपण स्वतःचा शोध घेतला पाहिजे. आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. त्याच अनुषंगाने करिअरचाही विचार केला पाहिजे. मग यश हात जोडून समोर उभे राहील.

Scroll to Top