We want freedom…
।। म्हणती थोर थोरही भले, मुले ही देवाघरची फुले ।।
खरतर प्रत्येक मुलं अव्दितीय असतं. त्या मुलाला प्रत्यक्षात जाणून घेणे. त्याच्यावरती प्रेम करणे. त्याला जगण्यासाठी बळ देणे. त्याच्या सुयोग्य वाढ आणि विकासाकरीता सतत प्रोत्साहन देत राहाणे. मुलांना शिकण्यासाठी काही करून पाहण्यासाठी प्रेरणा देत मनगट आणि मस्तकाचे भरण करणे. मुलांना प्रत्यक्ष अनुभवाने काही शिकू देणे हे शिक्षण असते. मुलांना मुके बनविणे नव्हे तर अधिक विचार संवादक बनविणे महत्वाचे आहे. विचार करण्यास प्रवृत्त करणे. शिकण्यास सक्षम करणे.. जीवनाच्या वाटचालीत आनंदक्षम प्रवास घडविण्यासाठी त्याच्या जीवनात पाऊलवाट निर्माण करण्याची जबाबदारी पार पाडणे म्हणजे पालकत्व असते.
मुलं म्हणजे मोठयांचे प्रतिबिंब असा आपला समज आहे. खरेतर प्रत्येक मुलं हे स्वतंत्र असते. मोठयांना जशी अवयव असतात तशीच अवयव लहान मुलांना देखील असतात. मानसशास्त्राच्या भाषेत मोठयांच्या मध्ये जसा आत्मा, मन असते तसेच लहान मुलांमध्ये देखील त्याचे आस्तित्व असते. मोठयांना भावभावना असतात, त्या प्रमाणे लहान मुलांना देखील भावभावना असतात. भावभावनाचे रूप देखील समान असते. सुख, दुःखाच्या भावना व्यक्त करणे देखील समान पातळीवर होत असते. फरक काय तर मुलांना जे शरीर असते ते लहान असते आणि वय कमी असते इतकेच. मात्र या लहान वयांतील बालकांना आपण स्वातंत्र वृत्तीने जगू देत नाही.
मात्र मोठेपणाचा असा विचार बालकांमध्ये रूजण्यापेक्षा प्रत्येकाला जाणून घेणे, विचाराच्या समृध्दीकरणाचे दर्शन घडणे महत्वाचे आहे. त्यामुळे शाळेत सुध्दा मोठी मुले लहान मुलांसोबत या स्वरूपाचे वर्तन करीत असतात.. मुलांना ज्या दिवशी आपण माणूस म्हणून समजावून घेऊ त्या दिवशी अधिक उत्तम समाजाची पाऊलवाट चालणे शक्य होईल. आपल्या मानसिक स्विकृतीत त्यांचे माणूसपण सामावलेले आहे. हा संस्कारच आपल्याला उत्तम लोकशाहीच्या दिशेने प्रवास घडवून आणेल. आपण लोकशाहीची भाषा करीत असलो तरी वर्तनात हुकूमशाही प्रदर्शन घडणार असेल तर भविष्याचा प्रवासही त्याच दिशेन घडणार यात शंका नाही. कारण हीच मुले उद्याच्या लोकशाहीचे वाहक असणार आहेत. शाळा आणि घर या बरोबर भोवताली देखील लोकशाहीचे चित्र असून उपयोग नाही तर तसे प्रत्यक्ष अनुभव जीवन व्यवहारात विद्यार्थ्यांना मिळायला हवेत. अन्यथा लोकशाहीचा घोका सुरू ठेवला तरी जगण्यात मात्र लोकशाही दिसू शकणार नाही. अनेकदा लोकशाहीच्या चेह-यामागेही हुकूमशाहीचे रूप असते. पण ती चूक त्या चेह-याची नाही. पारदर्शकता हा समाजाचा आरसा नाही कारण शिक्षणातून पारदर्शकतेची पेरणी करण्याचे राहून गेल्याने ते घडते आहे इतकेच.
खरेतर आपण लहान मुलांना पूर्ण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार की नाही ? हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक बालक म्हणजे पूर्णत्वाचा अविष्कार असतो. त्यांना जाणून घेतल्याशिवाय, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिल्याशिवाय आपण शिक्षणाची प्रक्रिया गतीमान करू शकणार नाही. शिक्षणाच्या प्रक्रियेत बालकाला जाणून घेण्याची निंतात गरज व्यक्त केली आहे. शिक्षणात देखील मुलांना समजावून घेतल्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. मुलांना जो शिक्षक जाणतो, ओळखतो, त्यांच्या भावनाची कदर करतो तोच शिक्षक ख-या अर्थाने मुलांना गुणवत्तेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. शिक्षक शिकवितात म्हणूनच शंभर टक्के विद्यार्थी शिकतात हा शिक्षणातील गैरसमज आहे. मुले तेव्हा शिकतात, जेव्हा शिक्षक मुलांना जाणून घेतात. जाणून घेणे आणि त्यानुसार मुलांना पुढे घेऊन जाणे हा खरा शिक्षण प्रवास असतो. शेतकरी शेती करतांना शेतात केवळ पेरणी करीत नाही. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमिनीची मशागत करीत असतो. त्या मशागतीनंतर त्यातील नको असलेले तण काढतो आणि जमिनीच्या पोतानुसार कोणते पिक पेरायचे हे ठरवतो. शेतक-याला कोणत्या जमिनीवर काय पेरले म्हणजे ते अधिक उगवेल यांची माहिती असते.
जेव्हा निर्मळ अंतःकरणाचे बालक खरेतर मोठयांच्या वाटेने चालू लागते आणि त्या वाटा अधिक भ्रष्ट असतात. त्या वाटेत व्देष, मत्सर, रागाचे काटे असतात. तेथे हिंसेची पेरणी असते. त्यामुळे मोठी माणंस जी पेरतात ते त्यांच्यामध्ये हळूहळू रूजते. मुल जे काही करते ते अनुकरण असते. त्याला अनुकरणाच्या वाटा अधिक प्रिय असतात. त्यामुळे आपण भवतालमध्ये भ्रष्टाचार, भ्रष्ट आचरणाची पेरणी केली तर तीच बालकात रूजते. आणि आपण त्याच्यात उत्तमतेचा ध्यास घेऊन पेरणी केली तर उत्तमची वाटेने चालणे ते पसंत करतात. आपण मुलांना नैसर्गिक जीवन व्यवहाराची वाट दाखविली तर त्या वाटेने चालणारी मुले अधिक निर्मळ आणि विवेकाने चालू लागतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचा पैसा घरात आणल्यावर त्या पैशाचे मोल त्या मुलांना कधीच राहात नाही. श्रमाचे मोल त्याला नसते. बाबा आणि आईने ते पैसे श्रमाशिवाय कमावले आहे. त्यामुळे बाबांच्या वर्तनावर त्याचा परिणाम दिसतो. बिगर कष्टाचा पैसा मनावर परिणाम करतो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या विचारावरती होतो आणि विचाराचा परिणाम वर्तनावर होत असतो. तो परिणाम पाहून संस्काराची शिदोरी पेरली जाणार नाही. तर अनुभवलेले, पाहिलेले आणि भवतालमध्ये घडणारे जे काही असते तेच मुल जाणतात. त्यामुळे मुले भ्रष्ट आहेत असे नाही तर त्यांचा भोवताल भ्रष्ट आहे. त्यामुळे ज्या वाटा मोठयांच्या त्या वाटा चालणे पसंत करतात, म्हणून आपणास त्यांनी भ्रष्टपध्दतीने जाऊ नये असे वाटत असेल तर आपणच आपल्या वाटा बदलायला हव्यात. वर्गात आणि शाळेत जगण,बोलण आणि वागण या एकरूप झाल्याशिवाय समाजाची उन्नतीची शक्यता नाही.
जमिनीची ओळख त्यांच्या मनात पक्की बनलेली असते. उत्तम पिकासाठी शेतकरी ज्या काही गोष्टी करतो तेच शिक्षणात देखील अभिप्रेत असतो. जमिन जमिन असते पण त्या प्रत्येक जमीनीच्या पोतात निश्चित फरक असतो. तसे प्रत्येक मुलं मुलं असते पण त्या प्रत्येकाची अभिरूची, कल, पूर्वानुभव, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परीसर भिन्न असतो. त्या भिन्नतेचा परीणाम मुलांच्या शिक्षणावरती होत असतो. केवळ बियाने उत्तम दर्जाचा असून चालत नाही. त्याकरीता जमिन आणि उपलब्ध इतर खते यांची विचार करून योग्य पेरणी करावी लागते. त्या प्रमाणे विद्यार्थीचा परीसर आणि पूर्वानुभवाचा विचार महत्वाचा ठरतो. त्यामुळे आपण मुलांना जाणून घेणे हेच शिक्षणात महत्वाचे आहे. त्याशिवाय सुरू असणारे अध्ययन अध्यापनाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नसते.
त्यामुळे ती विविधता लक्षात घेऊन अध्यापनाच्या घटकांसाठीच्या अध्ययन अनुभवाची पेरणी करावी लागते. ती झाली तरच पेरलेले उगवते. आपण अनेकदा मुलांना काय कळते असे म्हणत पुढे जात राहातो. पण तो विचार पुरेसा योग्य दिशेचा प्रवास घडवत नाही. मुलांना सारे काही समजते. मोठी माणंस जसा विचार करतात, त्या पलिकडे जाऊन देखील त्यांना तसा विचार करता येतो. त्यांना चांगले काय, वाईट काय हे कळते. त्यांच्या कळण्यात स्वार्थाचा लवलेश नसतो. त्यांचे शरीर जरी लहान असले तरी त्यांच्यात असलेला आत्मा मात्र महान असतो. शेवटी प्रत्येकात असलेला आत्मा हा ईश्वराचा अंश असतो. मुलात आणि प्रौढातील आत्म्यात कोणताच फरक नसतो. जर आत्मा सर्वांमध्ये एकच असेल तर शरीराच्या वयाच्या भेदावरती आपण मुलांना गृहित का धरतो हा खरा प्रश्न आहे. मात्र त्यांचा आत्मा हा परिपूर्ण आहे. मुलांचे शरीर देखील काही काळांने वाढतेच ना..! ज्या प्रमाणात शरीर वाढते त्या प्रमाणात त्याची शक्ती देखील वाढत असते. त्यामुळे त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवायला हवा.
मुलांचे शरीर लहान आहे, पण आत्मा महान आहे,
मुलांचे शरीर वाढते, मुलांची शक्ती वाढते,
पण त्यांचा आत्मा परीपूर्ण आहे.
अशा महान आत्म्याचा आपण आदर केला पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतींनी मुलाला भ्रष्ट करता कामा नये.