S R Dalvi (I) Foundation

पत्राद्वारे शिक्षण म्हणजे काय?

What is education by correspondence?

पत्रव्यवहाराने शिक्षण देण्याची पद्धती. व्यक्तीला आपल्या व्यावसायिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक गरजांनुसार शिकता यावे, म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. शाळा, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्था अशा प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था करतात. या शिक्षणपद्धतीचा उपयोग प्रौढ व्यक्ती, महिला, विशेषतः पडदा पाळणाऱ्या स्त्रिया, कामगार त्याचप्रमाणे भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या लोकसंख्येच्या गटांतील लोक यांना विशेष प्रकारे होतो.

पत्राद्वारे शिक्षणाला अधिक इतिहास आहे. भारतामध्ये सर्वात प्रथम सन १९६१ ला पत्राद्वारे शिक्षण तसेच रात्रशाळांविषयी अभ्यास करण्यास डी .एस .कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमेटी नेमण्यात आली या कमेटी तर्फे सुचविण्यात आलेल्या बाबीवरून जुलै १९६२ मध्ये पायलेट प्रोजेक्ट म्हणून बी.ए.कोर्ससाठी दिल्ली विद्यापीठामध्ये पत्राद्वारे शिक्षण सुरू करण्यात आले .सन १९६४-६६ च्या शिक्षण आयोगानेही यावर भार दिला . आयोगाने शास्त्र व तंत्रज्ञान विषयक शाखेमध्येही पत्राद्वारे शिक्षण सुरू करण्यास सुचविले. महाराष्ट्रात विविध विद्यापीठांनी बी.एड.चे कोर्सेस  या नावानी सुरू केलेले आहेत .

शैक्षणिक विस्तार वर्ग आणि स्वाध्याय यांपेक्षा पत्रद्वारा शिक्षण वेगळे असते. लेखी व छापील साहित्य, चित्रे व रेखाकृती इत्यादींचा उपयोग पत्रद्वारा शिक्षणपद्धतीत करण्यात येतो. हे या पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे. पत्रद्वारा शिक्षणात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नाही; किंवा कोणत्याही विद्यालयात जात नाही. पण ही उणीव शाळा किंवा संस्था विद्यार्थ्यांशी अभ्यासाविषयक कागदपत्रांची सतत देवाणघेवाण करून भरून काढते.

या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी शाळेत न जाता आपल्या घरीच व आपल्या इच्छेनुरूप शिक्षण घेत असतो. ज्या संस्थेत तो नाव नोंदवितो, त्या संस्थेतर्फे त्याला क्रमिक पुस्तके, त्यांवरील पश्नपत्रिका , प्रात्यक्षिक कामासंबंधी मार्गदर्शक सूचना, स्पष्टीकरणात्मक सूचना, आलेख, छोटे नकाशे इ. आवश्यक साहित्य टपालाने पुरविले जाते. हे सर्व साहित्य तज्ञ शिक्षकांकडून शैक्षणिक तत्त्वांनुसार तयार करून घेतलेले असते . सोबत परीक्षेचे प्रश्नही असतात. वर्षाचा अभ्यासक्रम आठवड्यानुसार वा इतर सोयीच्या कालावधीनुसार विभागलेला असतो.

हा विभागलेला अभ्यासक्रम व त्यातील प्रत्येक टप्पा विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक समजावून सांगण्यात येतो. अपेक्षित प्रश्नांनुसार पाठसाहित्य तयार करण्यात येते. विद्यार्थ्यातील विषय ग्रहण करण्याची पात्रता व अभ्यास करण्याची क्षमताही लक्षात घेऊन त्यांना योग्य ते साहाय्य करण्यात येते व त्यानुसार त्यांना अभ्यास करावयास सांगण्यात येते. वारंवार परीक्षा घेण्यात येतात. आवश्यकतेनुसार अभ्यासामध्ये मदत मागण्यास त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. बहुतेक शाळा आणि शैक्षणिक संस्था विद्यार्थांना उत्साहवर्धक पत्रे लिहून आणि त्यांच्या लिखाणावर उत्साहवर्धक शेरे देऊन त्यांना उत्तेजन देतात. काही संख्या पुढील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांस विद्यावेतन देतात आणि काम मिळविण्यासही मदत करतात. प्रगत पश्चिमी देशांत दूरध्वनी, नभोवाणी, दूरचित्रवाणी इ. साधनांचाही उपयोग शैक्षणिक सूचना देण्याच्या दृष्टीने करण्यात येतो. काही अभ्यासक्रमांत आवश्यक उपकरणे तसेच प्रयोगासाठी आवश्यक असणारी साधनेही पुरविली जातात. विद्यार्थ्यांनी आठवड्याचा किंवा ठरलेल्या सोयीच्या कालावधीचा अभ्यास पुरा करून, त्यांवरील प्रश्न सोडवून ते शिक्षणकेंद्राकडे टपालाने पाठवावयाचे असतात. तेथील शिक्षक ते लागलीच तपासून त्यांसबंधीच्या आपल्या सूचनांसह ते परत पाठवितात. अशा प्रकारे वर्षाचा अभ्यास पूरा झाला, म्हणचे विद्यार्थांनी वार्षिक परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरेही लिहून पाठवावयाची असतात. त्यांची उत्तरे समाधानकारक असली म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला, असे समजले जाते.

ही शिक्षणपद्धती अनेक कारणांसाठी उपयुक्त व फायदेशीर ठरते. शिक्षणकेंद्रापासून फार दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय या शिक्षणपद्धतीमुळे होऊ शकते. विद्यालयात आणि महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय या पद्धतीमुळे होऊ शकते. जागा, शिक्षणसाहित्य, वेळापत्रकांची बंधने इ. अडचणी नसल्यामुळे पत्रद्वारा शिक्षण देणाऱ्या संस्थांना विविध अभ्यासक्रमांची सोय करता येते. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येतात व आपल्या कुवतीप्रमाणे व सवडीनुसार आपला अभ्यासक्रम पुरा करता येतो. पत्रद्वारा शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या संख्येवर बंधन नसल्यामुळे एखाद्या अभ्यासक्रमाकरिता जितके विद्यार्थी नोंदविले जातील, तितका त्यांच्या शिक्षणावरील खर्च विभागला जाऊन एकूण पैशांत काटकसर होते, असे या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

या शिक्षणपद्धतीत काही उणिवाही दिसून येतात. शिक्षकांच्या प्रत्यक्ष सहवासाच्या अभावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप विद्यार्थ्यांवर पडू शकत नाही. नित्याच्या विद्यालयातून होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, सांघिक स्पर्धा इत्यादींना मुकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पुरेसा होत नाही, समृद्ध ग्रंथालयाचा उपयोग करता येत नाही, अभ्यासावर प्रत्यक्ष देखरेख नसल्यामुळे अभ्यास करण्याबाबत वा वार्षिक परीक्षेच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांकडून लबाड्या होण्याची शक्यता असते. या काही उणिवांपेक्षा या पद्धतींचे फायदे अधिक असल्यामुळे या पद्धतीचा अवलंब करण्याची प्रवृत्ती जगात वाढत्या प्रमाणावर दिसून येते.

औद्योगिक व व्यापारी संस्था आपल्या विषयांचे व कार्यक्रमांचे शिक्षण देण्याकरिता या शिक्षणपद्धतीचा उपयोग करतात. सरकारी संख्या, सैनिकी संघटना, कामगार व इतर संख्या आपल्या सभासदांची पात्रता व दर्जा वाढविण्याकरिता याच पद्धतीचा अवलंब करतात. विकसनशील राष्ट्रांनाही आपल्या नागरिकांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या पद्धतीचा उपयोग होत आहे. अपंग व एकाकी जीवन जगणारे लोकही या पद्धतीचा उपयोग करून घेऊ शकतात. पाश्चात्त्य देशांत बहुतेक सर्व प्रकारचे शिक्षण पत्रद्वारा देण्याची व्यवस्था आहे.

Scroll to Top