S R Dalvi (I) Foundation

सायबर सुरक्षा अभ्यासक्रम म्हणजे नक्की काय?

What exactly is a cyber security course?

अलीकडच्या दशकात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर ते खेडे असा प्रवास पूर्ण झाला असून मोबाईल क्रांतीमुळे इंटरनेट दैनंदिन गरज बनली आहे. संगणक युगात वावरत असताना त्याच्या फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही असतात. माणूस दिवसेंदिवस संगणकावर अवलंबून राहायला लागला असून अन्न, वस्त्र, निवारा या बरोबर इंटरनेट ही प्राथमिक गरज बनल्याचे दिसून येते आहे. डिजिटल युगाचा प्रारंभ होत असताना त्याच्या गैरवापराचे अनेक किस्से आपणास पहावयास, वाचावयास मिळतात. कालानुरूप बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि मोबाईलमध्ये आवश्यक बाबींचा समावेश झाल्याने त्याच्यावरील परावलंबित्व वाढले आहे. सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर अपरिहार्य झाला आहे. वेबसाईट हॅक करणे, ऑनलाइन बँकिंग अफरातफर करणे, सायबर बुलिंग सारखे प्रकार वाढत आहेत.

अलीकडेच रॅन्स्मवेअर या सायबर विषाणूने जगभरात धुमाकूळ घातल्याचे आपण पाहिलेले आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांना उत्तेजन देत असताना त्यातील फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अचानक इमेल हॅक होणे, संगणकातील महत्वाची माहिती गायब होणे आणि ती परत मिळविण्यासाठी पैशाची मागणी करणे, ऑनलाइन स्पर्धांमध्ये तुम्ही जिंकला आहात अमुकतमुक रक्कम या खात्यावर पाठवा किंवा तुमच्या एटीएमची मुदत संपली असून त्यावरील क्रमांक, पासवर्ड सांगा, येणारा ओटीपी कोड काय आहे? अशा माध्यमातून आर्थिक फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. इंटरनेटद्वारे क्रेडिट कार्ड चोरी, ब्लॅकमेलिंग, स्टॉकिंग, कॉपीराइट, ट्रेडमार्क फ्रॉड आदी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सायबर सुरक्षा म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.

सायबर सुरक्षा म्हणजे संगणक, सर्व्हर, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली, नेटवर्क यांचा डिजिटल हल्ल्यांपासून बचाव करणे.संगणक, मोबाइल उपकरणे, इलेक्ट्रॉनिक प्रणाली,सर्व्हर नेटवर्क आणि डेटा यासारख्या इंटरनेट शी जोडलेल्या सिस्टम्सचे डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे तंत्र म्हणजे सायबर सुरक्षा. सायबर आणि सुरक्षा या दोन शब्दांपासून सायबर सुरक्षा शब्द बनला आहे.सायबर म्हणजे ज्यामध्ये सिस्टम, नेटवर्क, डेटा समाविष्ट आहे असे तंत्रज्ञान.आणि सुरक्षा म्हणजे सिस्टिम,नेटवर्क यांच्या माहितीचे संरक्षण.सायबर सुरक्षा याला कॉम्प्युटर सुरक्षा किंवा माहिती तंत्रज्ञान सुरक्षा असेही म्हटले जाते.

यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये आगामी सत्र २०२२-२३ पासून सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. देशात दिवसागणिक वाढणारे सायबर हल्ले, हॅकींग, सायबर सुरक्षेसंदर्भातील प्रश्न पाहता या अभ्यासक्रमाची नितांत गरज आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ तयार करण्याची गरज ओळखून यामध्ये सायबर सुरक्षेच्या कायदेशीर, सामाजिक, आर्थिक पैलूंचीही जाणीव करून दिली जाणार आहे. सायबर सिक्युरिटी हे माहिती तंत्रज्ञानामधील (आयटी) विशिष्ट क्षेत्र असून, कॉम्प्युटर सायन्समधील उपप्रवाह आहे. सायबर हल्ल्यांपासून संगणक ऑपरेटिंग सिस्टिम्स, नेटवर्क आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. ऑनलाइन ट्रान्सॅक्ट किंवा संवेदनशील डेटा वाहून नेणाऱ्या कोणत्याही उद्योगाला अशा गुन्हेगारांपासून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा व्यावसायिकाची गरज असते.

डिजिटल इंडियामध्ये तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे आणि ते म्हणजे सुरक्षित आणि स्थिर डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने पोहोचवणे आणि देशातील वैश्विक डिजिटल साक्षरतेची मोहीम. यूजी सायबर सुरक्षा अभ्यासक्रमामध्ये व्याख्यान, ट्यूटोरियल, प्रॅक्टिकल-सराव या आधारे चार क्रेडिट्स दिले जातील. यामध्ये सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि कायदा, सोशल मीडिया आणि सिक्युरिटी, ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट, डिजिटल टूल्स आणि सायबर सिक्युरिटीमधील तंत्र इत्यादींचे सामान्य ज्ञान शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर कार्यक्रमात सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट, डेटा प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटी, सायबर लॉ आणि क्राइम इत्यादी विषय या अभ्यासक्रमात शिकवले जाणार आहेत.

सायबर सिक्युरिटी विषयाअंतर्गत सायबर स्पेस, वेब टेक्नॉलॉजी, इंटरनेट सोसायटी, सायबर क्राईम, सायबर गुन्ह्यांमुळे महिला आणि मुलांना कसा धोका आहे?, कोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत?, भारतात सायबर सुरक्षेवर आधारित प्रकरणे, हॅशटॅग, सोशल मीडियामधील गोपनीयता, इंटरनेट बँकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाइल पेमेंट, आधार, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट सुरक्षा, मोबाइल फोन सुरक्षा, डेटा बॅकअप, उपकरणे सुरक्षा, वाय-फाय सुरक्षा, अँटी व्हायरस, सायबर हल्ला, सायबर दहशतवाद, सायबर युद्ध, ऑनलाइन जॉब फ्रॉड, ट्रॅफिकिंग , मानवी तस्करी, जॉब स्कॅम, चाइल्ड पोर्नोग्राफी, सायबर पोलीस स्टेशन, एआय किंवा एमआय, ब्लॉकचेन, सायबर गुन्हे आणि शिक्षा, सायबर सुरक्षा ऑडिट इ. विषयाची माहिती मिळणार आहे.

Scroll to Top