S R Dalvi (I) Foundation

दहावी-नंतर पुढे काय?

What’s next after the tenth?

एखाद्या विद्यार्थ्याला काय व्हायचे आहे, तो दहावीनंतरच त्याचा अभ्यास सुरू करतो कारण दहावीपर्यंतचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सामान्य असतो आणि विद्यार्थी कोणत्याही राज्याचा किंवा बोर्डाचा असला तरीही प्रत्येकजण मॅट्रिकपर्यंत अभ्यास करतो. दहावी हा आपल्या करिअरचा, व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पाया मानला जातो. आजही आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच पुढे काय याची दिशा काही प्रमाणात ठरलेली असते. 

आपल्याकडे दहावी आणि बारावी म्हणजे टर्निंग पॉइंट मानले जातात. दहावी बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थी आणि पालक दोन्हींची परीक्षा असल्यासारखे असते. कारण यावेळी मिळणारे मार्क्स तुमच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवतात.पण निकाल लागल्यानंतरही हे ओझे हलके होत नाही. आता यानंतर काय हा प्रश्न निर्माण होतो. त्यातल्या त्यात दहावीनंतर निर्णय घेणे खूपच कठीण बनते. कारण आपल्याला नक्की कोणत्या शाखेत जायचेय हे ठरवावे लागते. या निर्णयावरच तुमच्या पुढील करीयरची दिशा ठरते.

या स्पर्धेच्या जगात, व्यावसायिक, करिअरच्या प्रांगणात आपले पाऊल पडणार असते, हे पाऊल टाकताना आपली आवड-निवड अन् आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती याचा विचार होणे अपेक्षित आहे. दहावीनंतर कला, शास्त्र अन् वाणिज्य या मुख्य फॅकल्टीशिवाय चाकोरीबाहेरच्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम राहतो. त्यात आयटीआय, कौशल्यवृद्धी करणारे तंत्रज्ञान अभ्यासक्रम आदींबाबतची माहितीही हवीच.

कितीही जास्त किंवा कमी गुण असतील तरी कुठेतरी विज्ञान शाखेला प्रवेश मिळतो का यासाठी प्रयत्न केले जातात. खूप प्रयत्न करूनही जर तिथे प्रवेश नाही मिळाला तर मग वाणिज्य म्हणजेच कॉमर्सचा विचार केला जातो. आणि इथेही खूप प्रयत्न करून फायदा झाला नाही तर नाईलाज म्हणून कला शाखेचा पर्याय स्वीकारला जातो. पण अशा प्रकारे करीयरची दिशा ठरलेले किती टक्के विद्यार्थी यशस्वी होत असतील हा मोठा प्रश्न आहे.

एकदा का या पायरीवर चुकीची निवड झाली की करीयरमधील महत्त्वाची वर्षे वाया जाण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आम्ही या लेखात सांगणार आहोत.

सगळ्यात आधी दहावी नंतर उपलब्ध असणाऱ्या शाखांबद्दल जाऊन घेऊयात.

 विज्ञान (Science)

अधिकाधिक पालकांची इच्छा असते की आपल्या पाल्याने विज्ञान शाखाच निवडावी. कारण यानंतर डॉक्टर, इंजिनियर असे प्रतिष्ठित समजले जाणारे मार्ग निवडता येतात. शिवाय याचा अजून एक फायदा असा असतो की तुम्ही दहावी बारावी विज्ञान शाखेतून केले आणि तुम्हाला वाटले की या शाखेतून करियर करायला नको तरीही फारसे काही अडत नाही. कारण बारावीनंतर तुम्हाला वाणिज्य आणि कला शाखा निवडण्याचा पर्याय खुला असतो. याउलट वाणिज्य आणि कला शाखेत ही मुभा नसते. त्यामुळे बरेचदा पालकांचा आग्रह असतो की विज्ञानच शाखा निवडावी. विद्यार्थी सुद्धा सेफ साइड म्हणून असा विचार करतात. ज्यांना या क्षेत्रांत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी तर ही शाखा निवडावीच. पण फक्त पालकांच्या इच्छेखातर वा सेफ साइड म्हणून असा निर्णय घेणाऱ्यांनी यातील अडचणींचाही विचार करायला हवा. ही शाखा जरा कठीण मानली जाते. आवड नसतानाही ती निवडून जर तुम्हाला तो अभ्यासक्रम जमला नाही तर वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय बारावीनंतर पुन्हा वेगळी शाखा घ्यायची म्हणजे अभ्यासक्रमात होणारा मोठा बदल आपल्याला स्वीकारता येणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. आणि हा सगळा गोंधळ वाढवण्यापेक्षा आपल्याला ज्यात रस आहे ते निवडणे कधीही उत्तमच.

वाणिज्य (Commerce)

वाणिज्य शाखेत आर्थिक व्यवहारांशी निगडीत संपूर्ण अभ्यासक्रम असतो. त्यामुळे इथे काटेकोरपणा आणि अचूकतेला खूप महत्त्व असते. म्हणूनच विज्ञान नाही मिळाले तर वाणिज्य निवडू असा विचार करणे चुकीचे आहे. या शाखेसाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यात आहेत का आणि यानंतर ज्या प्रकारची नोकरी असेल ती करणे त्याला जमणार आहे का याचाही विचार करायला हवा.

कला (Arts)

काहीच पर्याय नाही म्हणून नाईलाज समजल्या या शाखेतील सर्व पर्यायांची फारशी माहितीच घेतली जात नाही. खरंतर कला शाखेतून सुद्धा खूप मार्ग निवडतात येतात. समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि असे अनेक विषयात याद्वारे आपल्याला पदवी घेता येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा उत्तम पर्याय आहे. शिवाय या शाखेनंतर पुढे अनिमेशन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रिएटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग उपलब्ध होतात.

डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses)

अकरावी बारावीचे शिक्षण न घेता या कोर्सेसाचाही पर्याय निवडता येतो. डिप्लोमानंतर तुम्ही ज्या विषयात डिप्लोमा केला त्याच्या पदवीलाही प्रवेश घेता येतो. पण डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला नक्की कशात करियर करायचे हे नक्की असावे लागते. कारण एकदा की हा मार्ग निवडला की तुम्हाला पर्याय नसतो. त्याच विषयात पुढील शिक्षण घेणे बंधनकारक असते. याचा एक फायदा असा की जर तुमची दिशा नक्की असेल तर इतर विषयांचा अभ्यास न करता तुम्हाला फक्त आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

ही झाली शाखांबाद्दलची माहिती. परंतु या शाखा निवडताना इतरही काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

१. आवड आणि इच्छा

तुम्ही जी दिशा निवडता त्यात तुम्हाला पुढील आयुष्यभर काम करायचे असते. त्यामुळे त्यातून किती पैसा कमावता येऊ शकतो एवढाच विचार न करता आपण हे काम एवढ्या मोठ्या कालावधीसाठी करू शकू का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. तुमच्या विषय आणि अभ्यास बद्दलच्या आवडी निवडी जाणून घ्या. त्या माहिती नसल्यास वेळ घेऊन आपल्याला नक्की काय आवडते ते ठरवा. कारण आपल्याला आवडणाऱ्या विषयात काम करण्याचा सहसा कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करियर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते. शिवाय आवड असल्याने त्यात प्रगती करणेही अवघड वाटत नाही.

२. व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास

जर आपण स्वतच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेतले तर करियर निवडणे अधिक सोपे होते. कारण त्याने आपण कुठे कमकुवत आहोत कुठे कमी पडतो हे कळते व त्यावर अधिक लक्ष देता येते. शिवाय काय सहज जमते, आपल्यात काय कौशल्ये आहेत याचीही जाणीव होते. मग अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला कोणता अभ्यासक्रम आणि कसे करियर अधिक उत्तम ठरेल याचा अंदाज करणे तितकेसे कठीण नसते.

३. अनुभवी लोकांशी चर्चा

ज्या विषयात आपल्याला रस आहे त्यात पूर्वी करियर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे ठरते. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक, शिक्षक, मोठे बहीण भाऊ यांनाही तुम्ही तुमच्या शंका सांगायला हव्यात. त्याने उत्तरे तर मिळतातच पण नवीन माहितीही मिळते. या लोकांना बरेचदा तुमच्या बद्दल अशा गोष्टी माहिती असतात ज्याची तुम्हालाही कल्पना नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात.

४. करियर कौन्सिलर

जेव्हा बराच विचार करूनही नक्की काय करावे सुचत नाही तेव्हा करियर कौन्सिलरकडे जाणे हा उत्तम पर्याय आहे. किंवा जेव्हा बराच विचार करूनही नक्की काय करावे सुचत नाही तेव्हा करियर कौन्सिलरकडे जाणे हा उत्तम पर्याय आहे. किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तरीही हा पर्याय असतो. कारण कौन्सिलर अशा काही चाचण्या घेतात ज्याने तुमचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे कळते. तुमचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारच्या करियरसाठी योग्य आहे हे ही त्यातून कळते. शिवाय त्यांना सगळ्या शाखांबद्दल आणि संधींबद्दल ज्ञान असते. त्यामुळे ते तुमची मोठी मदत करू शकतात.

५. निर्णयक्षमता

तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय मार्ग निवडतेय याचाही विचार करु नका. स्वतच्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वत: घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हाला काय करायचे हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा. थोडक्यात काय तर हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी असल्याने तो पूर्णपणे अभ्यास करून घ्यायला हवा. त्यात पर्यायांचा अभ्यास तर कराच पण स्वतःचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. एकदा का तो केला की कामाला लागा. मग तुमचे ध्येय गाठण्यापासून कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

Scroll to Top