When and why is Goa Mukti Day celebrated?
पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि भारतात त्याचा समावेश झाला. अनेकांनी प्राणांचे मोल देऊन गोव्याला स्वातंत्र्य मिळवून दिले.
१५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हापासून गोमंतकीय जनतेचे जे नष्टचर्य सुरू झाले ते तब्बल साडेचारशे वर्षांनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी संपले. १९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती प्रक्रियेचा शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता.
हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा निर्णायक भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. भारतातील घडामोडी शांत झाल्यावर पंतप्रधान पंडित नेहरु यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यावर भर दिला; पण गोव्याचे भारतात विलिनीकरण करण्याच्या बाजूने पोर्तुगीज नव्हते. नेहरु यांनी भारत आणि पोर्तुगीज कॉलनीत चांगले संबंध राहण्याच्या दिशेने पाऊले उचलली; पण या कॉलन्यांमधील प्रशासक भारताला सहकार्य करीत नव्हते. अखेर नेहरु यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पोर्तुगीजांवर दबाव आणला. शांततेच्या मार्गाने भारत सोडून जाण्याचा संदेश दिला. वाटाघाटी यशस्वी होत नसल्याने, जवाहरलाल नेहरु यांनी १७ डिसेंबर १९६१ रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील जनतेने सैन्याचे स्वागत आणि सहकार्य केले. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमण आधीच मुक्त झाले होते.
या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ मध्ये सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली. दोन्ही खासदार व बहुसंख्य आमदार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निवडून आले. पक्षाचे अध्यक्ष दयानंद बांदोडकर यांनी निवडणूक लढवली होती. बांदोडकर हे या प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून, वास्को हे राज्यातील सर्वांत मोठे, तर पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले ऐतिहासिक मडगाव हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे.