S R Dalvi (I) Foundation

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…

आजकाल लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच टेक्नोसेव्ही झाले आहेत. हल्लीच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण जास्तीत जास्त काम ऑनलाइन करण्यावर भर देत आहोत. अगदी घरगुती वस्तू खरेदी करण्यापासून ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यापर्यंत सगळच ऑनलाइन झाले आहे. कोरोनाच्या काळात तर आता विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मुलांच्या घरापर्यंत आली आहेत. विशेषत: कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा कल खूप वाढला. पण ऑनलाइन शिक्षण मुलांसाठी फायद्याचे की तोट्याचे हा विषय डिबेट करण्यासारखाच आहे. कारण काही गोष्टींचे जसे फायदे असतात तसेच काही तोटे ही असतात. आज आपण ऑनलाइन शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे ( Advantages and Disadvantages of online learning) यावर नजर टाकणार आहोत. 


सुरुवातीला ऑनलाइन शिक्षणाचे फायदे पाहूयात:


वेळेची बचत :

ऑनलाइन क्लासेसमध्ये मुलांना शाळेत जावे लागत नाही, त्यामुळे त्यांचा बराच वेळ वाचतो. घरापासून शाळा दूर असल्यामुळे, मुलांना बऱ्याचदा थकवा येतो त्यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शिवाय, शाळा आणि शिकवणीला जाण्यासाठी लागणारा वेळ यामुळे मुलांना त्यांचे इतर छंद जोपासण्यासाठी वेळ मिळत नाही. ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांचा बराच वेळ वाचतो त्यामुळे त्यांना अभ्यासाव्यातिरिक्त संगीत, नृत्य ,चित्रकला यांसारखे इतर क्रियाकलापांसाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.


आरामदायक आणि सोयीस्कर:

शाळेच्या दिवसात बऱ्याचदा मुले बाहेरील पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे त्या अन्नातून विषबाधा होण्याचा जास्त धोका असतो तसेच उन्हाळ्यात सनबर्न, उष्माघात, त्वचेवर पुरळ इत्यादी आरोग्याच्या समस्या ही त्यांना उद्भवू शकतात. ऑनलाइन अभ्यासामध्ये मुले घरातील कोणत्याही आरामदायी ठिकाणी बसून सहज अभ्यास करू शकतात.आणि त्यांना घरातील ताजे आणि गरम अन्न सेवन करता येते. त्यामुळे मुले जंक फूडचे सेवन टाळू शकतात.


गॅजेट फ्रेंडली :

ऑनलाइन अभ्यासासाठी, मुलांना नोटबुक, लॅपटॉप आणि टॅब्लेटची आवश्यकता आहे, कारण मुलांना व्हॉट्सअॅप आणि जीमेल सारख्या हाय-टेक सोशल ऍप्लिकेशन्सवर गृहपाठ दिला जातो. मुले व्हिडिओ चॅट द्वारे शिक्षकांशी संवाद साधतात. मुलांसाठी, लहान वयात गॅझेट्सच्या संपर्कात येणे त्यांच्या संज्ञानात्मक कौशल्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलांना वाचनाच्या नवीन पद्धतीचा परिचय होतो.


व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासाची उजळणी:

विद्यार्थी शाळेत किंवा ट्यूशनमध्ये उशीरा पोहचला की होऊन गेलेला अभ्यास त्याला पुन्हा शिकवला जात नाही मात्र ऑनलाइन शिक्षणामध्ये ऑनलाइन झालेले लेक्चर व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक सेव्ह करुन विद्यार्थ्यांना पाठवू शकतात त्यामुळे जर एखाद्याचा तास मिस जरी झाला असेल तर त्याला व्हिडिओच्या माध्यमातून तो शिकता येतो.आणि काही विसरल्यास पुनः तो व्हिडिओ बघून उजळणी करता येऊ शकते.


आता ऑनलाइन शिक्षणाचे तोटे पाहूयात


आत्मविश्वास खुंटू शकतो :  

ऑनलाइन शिक्षणाचा एक मोठा तोटा म्हणजे मुलाला बाहेरच्या वातावरणात जास्त वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. मुलाच्या मानसिक विकासासाठी सामाजिक संवाद देखील खूप महत्वाचा आहे. वर्गमित्रांचा गट मुलाला बाहेरील वातावरणात मिसळण्यास मदत करू शकतो आणि यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढू शकतो.


लक्ष भटकण्याच्या धोका:

ई-लर्निंग दरम्यान मुलाचे मन इकडे तिकडे भटकू शकते. मुल अभ्यासाच्या बहाण्याने मोबाईलवर गेम आणि इतर कामांमध्ये व्यस्त राहू शकतात, त्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. यामुळे मुले त्यांच्या ध्येयापासून दूर जाऊ शकतात. तसेच अभ्यासाच्या बहाण्याने ते मोबाईलमधील सर्व प्रकारचे गेम व इतर चुकीच्या गोष्टीही पाहू लागतात . तसेच सगळ्याच पालकांना 24 तास आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे या काळात, त्यांना अभ्यासात चांगला विकास करणे थोडे कठीण होते. ऑनलाइन शिक्षणाचाहाही सर्वात मोठा तोटा आहे.


डोळ्यांचे विकार होण्याचा धोका

ऑनलाइन अभ्यासादरम्यान, मुलांना त्यांची नजर स्क्रीनवर दीर्घकाळ टिकवून ठेवावी लागते. कंप्युटर किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ घालवल्याने मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. खरं तर, मुलं स्क्रीनकडे टक लावून पाहतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर अधिक दबाव निर्माण होतो. अनेक वेळा मुले अंधुक दिसण्याची तक्रार करतात, असे असूनही ते पडद्याच्या अगदी जवळ राहून अभ्यास करतात. यामुळे मुलाचे डोळे पूर्वीपेक्षा अधिक असुरक्षित होऊ शकतात.


महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहण्याचा धोका:

कधीकधी ई-लर्निंग मध्ये तंत्रज्ञानाच्या समस्या देखील उद्भवू शकतात, ज्यामुळे मुलाची वाचनाची लय बिघडू शकते. ऑनलाइन अभ्यासात वारंवार इंटरनेट कनेक्शन तुटणे किंवा गॅझेटमधील तांत्रिक बिघाडामुळे मुले अभ्यासात चांगले लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे मुलामध्ये चिडचिड आणि राग येऊ शकतो. अनेक वेळा ऑनलाइन क्लासेसदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मुलांना एखाद्या विषयाच्या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहावे लागते.

शिस्त लागत नाही:

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काही नियम आखून दिलेले असतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते. जसे यूनिफॉर्म नीटनेटका असणे, केस व्यवस्थित कापलेले असणे, हातापायाची नखे वाढलेली नसणे या आणि अशा बऱ्याच शिस्तीच्या गोष्टी आपल्याला शाळेपासुनच शिकवल्या जातात ज्याचा उपयोग आणि फायदा आपण किती ही मोठे झालो तरी होतो.


शेअरिंग आणि केअरिंग:

‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरु सुपंथ’ हे वाक्य आपल्यातील प्रत्येकाने ऐकले असेल. कारण एकमेकांना मदत करणे हे प्रत्येकाला जमले पाहिजे अगदी आजच्या जनरेशन च्या भाषेत बोलायचे झाले तर शेअरिंग आणि केअरिंग या खुप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ही सवय तेव्हाच लागू शकते जेव्हा तुम्ही इतर लोकांमध्ये राहता. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना एकट राहण्याची सवय होतो ज्यामुळे आपल्या गोष्टी इतर विद्यार्थ्यांसह शेअर करण्याचा अनुभव ते घेऊन शकत नाहीत जो त्यांच्यासाठी पुढे जाऊन मोठा तोटा ठरू शकतो. 

Scroll to Top