S R Dalvi (I) Foundation

तुमच्या मुलांचेही होत आहेत का ‘मूड स्विंग्स( Mood Swings)? पहा कशी हाताळाल परिस्थिती…

जर तुम्ही किशोरवयीन किंवा त्यांच्यापेक्षा लहान मुलाचे संगोपन करत असाल तर जोरात दरवाजा बंद करणे, खोलीतील सामान फेकणे, डोळ्यांतून विनाकारण अश्रू वाहू लागणे, पाय आपटणे अशा घटना तुमच्या मुलांनी केलेल्या तुम्ही पाहिल्या असतीलच. ‘मला एकटे सोडा’, ‘तुम्हाला जे करायचं ते करा’ हे आणि असे अनके डायलॉग्ज ही तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कधीकधी मुले बरोबर ही असतात मात्र बहुतेक वेळा ते फक्त नको असलेले नाटकच असते. अशा वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते शांत होण्याऐवजी त्या उलट होते. मग ते पाहून तुम्हालाही राग येतो बरोबर की नाही?खरं तर असे आहे की प्रत्येक पालक आणि मूल या टप्प्यातून जात असते. आपणही आपल्या पालकांशी कधी ना कधी उद्धटपणे आणि वाईट वागले असालच. आता तुमच्यावर तुमच्या मुलांचे वर्तन हाताळण्याची वेळ आली आहे. वाढत्या मुलांमध्ये मनःस्थिती बदलणे सामान्य आहे, आणि तुम्ही ते पूर्णतः दुरुस्त करू शकत नाही परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही निश्चितपणे मार्ग शोधू शकता.जर तुमच्या मुलांचे ही मूड स्विंग्स होत असतील तर आज आपण अशा काही सोप्या गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला या दरम्यान नक्कीच उपयोगी पडतील.


सहानुभूती दाखवा आणि त्यांना समजून घ्या
तुम्ही स्वतःला त्यांच्या जागी ठेऊन विचार करा. आजच्या मुलांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. अभ्यासाचा ताण खूप वाढला आहे. त्यांना दैनंदिन शाळा, इतर उपक्रम आणि त्यानंतर त्यांचा गृहपाठ ही पूर्ण करावा लागतो. अशा वेळी त्यांना बऱ्याचदा एकटे आणि हरवल्यासारखं वाटते. त्यामुळे अशा वेळी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

त्यांना सांगा की तुम्ही पाठिंबा देण्यासाठी सदैव त्यांच्या बरोबर आहात

जर ते ओरडून बोलत असतील तर त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या वागण्यामागचे कारण शोधा. त्यांच्या वागण्यात हा बदल का झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मूड स्विंग्सवर रागावू नका परंतु त्यांना तुमचा पाठिंबा दर्शवा. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना काय त्रास होत आहे ते शोधा. जर त्यांनी तुमच्याशी बोलण्यास नकार दिला तर त्यांना त्या वेळेपुरते एकटे सोडा पण तुम्ही त्यांच्यासोबत आहात असे त्यांना वाटू दया.जेव्हा ते शांत होतील तेव्हा तुम्ही जेवताना किंवा टीव्ही पाहताना त्याबद्दल त्यांना पुन्हा त्यांच्या अशा वागण्याचे कारण विचारू शकता.


आपल्या मर्यादा ठरवा

तुम्ही तुमच्या मुलाचे कोणते वर्तन कसे स्वीकारता आणि कसे नाकारता याबद्दल स्पष्ट रहा. हे तुमच्यासाठी एक मर्यादा तयार करण्यात मदत करेल. तुमचे मूल तुमच्या मर्यादांची सीमा पाहिल. त्याला हे जाणून घ्यायचे असेल की, ते हे वर्तन किती वेळ ताणून धरु शकतात आणि तुम्ही त्याला किती सूट देऊ शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर ते मर्यादेच्या बाहेर जाऊ लागले तर त्यांना वेळीच सतर्क करा.


शांत राहा आणि टीका करू नका
तुम्ही स्वतःला त्यांची निंदा करण्यापासून आणि त्यांच्यावर कोणतीही कमेंट करण्यापासून दूर ठेवा. काही वेळेस असे असू शकते की तुमची मुले ओवररिएक्ट करत असतील पण तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे लागेल. पाल्याच्या भावनिक अवस्थेत तुम्ही वाहून जाऊ नका. जर तुम्ही त्यांची चेष्टा केली आणि त्याला टोमणे मारले तर त्याला असे वाटेल की संपूर्ण जग त्यांच्या विरोधात आहे. अशा वेळी तुमचा संयम सुटला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असते.

तुमच्या मुलांसोबत खेळा त्यांच्याबरोबर वेळ घालवा
जर तुमचे मूल खराब मूडमध्ये असेल तर त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासोबत खेळा यामुळे कदाचित त्यांचा मूड सुधारेल. शारीरिक व्यायामातून एंडोर्फिन रिलीज होतो आणि त्यामुळे मूड स्विंग मध्ये देखील आराम मिळतो .जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात आणि मुलामध्ये दररोज भांडण होत आहे तर स्वतःला एकटे समजू नका. इतर पालकांशी याबद्दल बोला आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या.

निराश होऊ नका, ही वेळही निघून जाईल आणि परिस्थिती नक्कीच चांगली होईल.

Scroll to Top