Is your child’s brain formed of mud?
“बघा ना सर हा माझा मुलगा ना नुसता मातीचा गोळा आहे , अभ्यास करत नाही ,वाचलेले विसरतो, या मातीच्या गोळ्याला फक्त खेळायला आवडते .”
बऱ्याचदा ” मातीचा गोळा ” या शब्दाने मुलांना संबोधलं जाते . मुले म्हणजे खरंच मातीचा गोळा असतात का?
प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा मातीचा म्हणजेच एखाद्या निर्जीव वस्तूचा वैगरे गोळा नसतो . त्यांच्यामध्ये मेंदू नावाची अतिशय जिवंत यंत्रणा प्रत्येक क्षणाला काम करत असते. पालकांनी मुलांसोबत घालवलेले चांगले क्षण जसं की गोष्ट वाचून दाखवणं, फिरणं, खेळणं यांची नोंद त्याच्या मेंदूतल्या समरणक्षेत्रात कायमची राहते . मुलांचे रडणं, रागावणं, हट्ट करणं, याचीही नोंद त्यांचा मेंदू घेत असतो .
थोडक्यात सांगायचं झाला तर हा कुठल्याही अर्थाने मातीचा गोळा नाही. तो सभोवतालच्या सगळ्या बारीक- सारीक घडामोडींची नोंद घेणारा, ती लक्षात ठेवणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला घडवणारा बुद्धिमान जीव आहे.
मागे वळून बघताना आपल्या आयुष्यावर ज्यांचा दूरगामी प्रभाव आहे अशा एक-दोन शिक्षकांची नावे तरी आपल्याला आठवतातच. त्यामुळे ‘शाळा’ नावाच्या समाजव्यवस्थेचे मुलांच्या आयुष्यातील स्थान खूप मोठे आहे. शाळा ही केवळ व्यावसायिक सेवा पुरवणारी फॅक्टरी असून चालणारच नाही. मुलांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक ऊर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक आणि शाळेमध्ये सहकार्य हवे. मुलांच्या सक्षम वाढीसाठी शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आवश्यक आहे, ते शाळा आणि पालकांमधले ‘सुजाण नाते.’
पालक व शिक्षक यांनी मुलांच्या मानसिकतेचा अधिक विचार करणे गरजेचे आहे . मुलांना असे कोणतेही लेबल्स न लावता त्यांना कौतुकाची, मायेची गरज आहे हे समजून घ्यायला हवे . मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांचा सहयोग अतिशय महत्त्वाचा आहे.
चला तर मग आता शाळा सुरु होणार आहेत , स्वतला घडविणाऱ्या या जीवाला ‘मातीचा गोळा’ न समजता तो एक बुद्धिमान जीव आहे . हे आपण लक्षात घेऊया. त्यानुसार मुलांशी वागूया !