School assembly
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.
शाळेची सुरवात जेव्हा परिपाठाने होते, त्या वेळी मुलांना परिपाठाची तयारी करण्यासाठी बोलावतो तेव्हा मुले लांब पळतात. मुली पटकन तयार होतात. त्यामुळे आज प्रत्येक गोष्टीत मुलीच पुढे दिसतात. वर्गात खरंतर अशी अनेक मुले असतात, की त्यांना बोलायचे असते; परंतु बुजऱ्या स्वभावामुळे ती मागे पडतात. काही मुले पटकन उत्तरे देतात. पटकन बोलणाऱ्यांचे वर्गातलं प्रमाण पाच टक्के असते. बुजऱ्या, शांत मुला-मुलींचे प्रमाण २० टक्के असते. वर्गात अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या घाईगर्दीत अशा बुजऱ्या मुलांकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होते; पण अशी मुले हेरून त्यांना विविध उपक्रमांत, कार्यक्रमांत सहभागी करून घ्यायला हवे.
मुलांची आवड, कल बघून ते काय चांगले करू शकतात यासाठी त्यांना प्रोत्साहन, संधी दिली, तर त्यांच्या लक्षात येईल, की अरे, हे काम मी चांगले करू शकतो. हे काम केल्यावर सर्वांनी माझे कौतुक केले. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास येऊन ते अभ्यासाला, कामाला उत्साहाने लागतात.
शिक्षकांनी मुलांनी केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींना जर शाबासकीची थाप दिली, तर त्यांचा हुरूप वाढतो. त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यांना सापडतो. हुशार मुला-मुलींनाच नाही, तर शांत, संथ मुलांनाही बरोबर घेऊन चालण्यात खरे यश आहे. एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वांनी मिळून पुढे जाण्याचा मार्ग खरंच आनंद देणारा असतो. मुलांना शाळेत आपण सर्व सामान आहोत आणि एकमेकांसोबत पुढे जात आहोत ही भावना येणे खूप महत्वाचे आहे.