Villages in India
भारत हा देश अनेक राज्यांत मिळून तयार झालेला आहे. शहर व खेडे मिळून राज्यांची निर्मिती झालेली आहे. शहर व खेडे यांमध्ये आपल्याला बरीच तफावत पहावयास मिळते. शहरांपेक्षा खेड्यांतील जीवन आनंदी, निरोगी आणि चैतन्यमय असते. सध्या खेड्यांनीही शहरीकरणाची आस धरल्याने कुटुंबातील सुसंवाद हरवत चालला आहे. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतात 90% शेती ही ग्रामीण भागांमध्ये होते. म्हणजेच खेड्यांमध्ये होते. जेव्हा खेड्यातील शेतकरी आपल्या शेतीमध्ये पीक पिकवतात तेव्हा ते धान्य संपूर्ण देशाला पुरवले जाते. किंबहुना बाहेरच्या देशात सुद्धा पाठविले जाते. यावरूनच कळते ही भारताला कृषिप्रधान देश बनण्यामागे मोठा हात आहे. तो म्हणजे या खेड्यांचाच त्यामुळे खेड्यांचा विकास होणे गरजेचे आहे.
भारतामध्ये एकूण 60 लक्ष 49 हजार खेडी आहेत. यातील बरीचशी खेडी आजही स्वातंत्र्यसूर्याच्या प्रकाशापासून दूर आहेत. शहरे आणि खेडी यातील अंतर किती कमी झाले असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर देणे अवघड आहे. जोपर्यंत आपण महानगरे आणि खेडी यातील अंतर कमी करत नाही, तोपर्यंत इंडिया आणि भारत यातील अंतर वाढतच राहणार आहे. आज सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आपल्या समाजात किती रूजली आहे?
आजही भारतात काही अशी खेडी आहेत, की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी उपलब्ध नाहीत. वीज पुरवठा नाही ना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षणाची ही सुविधा नाही. त्यामुळे त्या खेड्यातील लोक अज्ञानी राहत आहेत. तर काही लोक सुख- सुविधांच्या शोधात शहरांकडे धावत आहेत. अश्या खेड्यांचे स्वरूप बदलणे आज गरजेची गोष्ट झाली आहे.
कारण आपल्या भारतातील लोकसंख्येच्या निम्मी लोक हे खेड्यात राहतात. मग या खेड्यांचा विकास व्हायला नकोय का? आपल्या देशातील खेड्यांचा विकास व्हायलाच पाहिजे. जेव्हा या खेड्यातील प्रत्येक नागरिकाची प्रगती होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश प्रगती करेल. खेड्यातील लोकांनाही शहराप्रमाणे सर्व सुविधा मिळायला हव्यात. शिक्षणाची सोय व्हायला हवी. इथल्या लोकांना योग्य तो औषधोपचार, विजेची सोय, रस्ते, घरे मिळाली पाहिजेत. शहराप्रमाणे येथील लोकांनाही उद्योग-धंदा, काम यांच्या मध्ये मदत झाली पाहिजे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञानाचे ज्ञान देऊन त्यांच्याकडून उत्तम शेती करून घेतली पाहिजे. संपूर्ण देशाला अन्न पुरवणाऱ्या या खेड्यांतील लोकांच्या विकासाचा विचार व्हायला हवा. ज्या दिवशी भारतातील सर्व खेड्यांचा विकास होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या भारताचा विकास होईल.
भारतातील खेड्यांमधील काही बदल झालेला आहे तो आपण पाहूया.
पहिला सर्वात मोठा बदल म्हणजे शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याविषयीची आस्था! आपण भारतातील कोणत्याही ग्रामीण भागात गेलो आणि तेथे रस्त्यावर दगड फोडणाऱ्या बाईला जर विचारले की, ‘तुला आयुष्यात काय करायचे आहे?’ तर त्यातील 100 पैकी 100 जणी सांगतात की, ‘मला माझ्या मुलीला/ मुलाला शिकवायचे आहे.’ शिक्षणाचे फायदे, तोटे, उपयोग याचे गणित तिच्याकडे नाही; परंतु शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव तिला नक्कीच झाली आहे. ग्रामीण भागांत 20 वर्षांपूर्वी माध्यमिक शिक्षण सात-आठ किलोमीटरच्या अंतरावर होते, तर उच्च शिक्षण 15-16 किलोमीटर अंतरावर होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आता ग्रामीण भागात हाकेच्या अंतरावर उपलब्ध झालेले आहे. उच्च शिक्षणासाठी तालुक्या-जिल्ह्य़ापर्यंत रोज ये-जा करणे किंवा तिथे राहून शिक्षण घेणे ग्रामीण भागातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना शक्य होत आहे. आज ग्रामीण भागातील साधारण 15 कोटी मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यापैकी साधारण दहा कोटी विद्यार्थाना मध्यान्ह जेवणाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मुलांची शाळेतली उपस्थिती आणि विद्यार्थीसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जात असल्यामुळे शाळेतील मुलींची संख्याही चांगली वाढली आहे. ग्रामीण भागाचा चेहरा बदलणारा दुसरा महत्त्वाचा बदल आहे, तो संपर्क आणि दळवणळणाची साधने यामुळे झालेला! आज दूरचित्रवाणी 90 टक्क्याहून अधिक गावांपर्यंत पोहोचली आहे. तसेच सॅटेलाइट टीव्हीही 45 ते 55 टक्के गावांतून पोहोचला आहे. सर्वात मोठी क्रांती घडते आहे ती डीटीएचमुळे त्याअंतर्गत साधारणपणे मोबाइलचा सर्वात चांगला आणि उत्तम वापर कुठे होत असेल तर तो ग्रामीण भागात होत आहे. कारण ती त्यांच्या चैनीची नाही, तर आत्यंतिक उपयोगाची गोष्ट आहे. शेजारच्या गावातील मुलीची ख्यालीखुशाली कळायला एकेकाळी आठ-आठ दिवस लागत. जिल्हयाच्या धान्यबाजारातले भाव जाणून घेण्यासाठी गावातून माणूस पाठवावा लागे. अशा कित्येक गोष्टी मोबाइलमुळे आज सहज-सोप्या झाल्या आहेत.
तिसरा सकारात्मक बदल म्हणजे शेतीमालाला किमान आधारभूत किंमत आज आपण जगातील सर्वात जास्त कडधान्ये पिकवणारा देश आहोत. आज कोणतेही पीक हे ‘नकदी पीक’ झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 15-20 वर्षांपूर्वी कुणी ग्रामीण भागात भाजी विकत घ्यायला गेला तर त्याला भाजीबरोबर मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता अशा दोन-तीन गोष्टी विनामूल्य मिळत. आज तशा त्या मिळत नाहीत. त्यासाठी रीतसर पैसे मोजावे लागतात. याचाच अर्थ या सर्व उत्पादनांचे पसे शेतकऱ्यांना आज मिळत आहेत. त्यामुळे त्यांची क्रयशक्तीही वाढत आहे. कापूस, ऊस, कडधान्ये या पिकांबाबतही आता शेतकरी एका मर्यादेपर्यंत भाव मागून घेण्याबाबत आग्रही असतो. त्यासाठी तो वाट पाहू शकतो आणि तो भाव त्याला काही प्रमाणात का होईना, मिळू लागला आहे.
चौथा सकारात्मक बदल म्हणजे आज केंद्र व राज्य शासन आपल्या बजेटमधील मोठा हिस्सा ग्रामीण भागावर खर्च करत आहेत. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. ग्रामीण सडक योजना, राजीव गांधी आवास योजना या योजनांमुळे ग्रामीण भागातील अकुशल व्यक्तींना रोजगार मिळत आहे. केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे. एकेकाळी दिवसभर काबाडकष्ट करून शेतमजुरांना त्याचा पुरेसा मोबदला मिळत नसे. एवढ्या पैशात काम करा, नाहीतर घरी बसा असे त्यांना ऐकवले जायचे. आता ही परिस्थिती खूपच पालटली आहे. यामुळे भूमिहीन शेतमजुरांची आर्थिक स्थिती, त्यांचे राहणीमान आणि जीवनशैली यांत मोठा बदल होतो आहे.
पाचवा मुद्दा पंचायत राजचा आहे. एकेकाळी उंबरठ्याबाहेरही पडू न शकणाऱ्या स्त्रियांना राजकारण हे निषिद्ध क्षेत्र होते. पण आज त्यातही महिला सक्रीय सहभाग घेऊ लागल्या आहेत. महिलांचा ग्रामपंचायतीमधील व निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढला आहे. भारतात आजघडीला आठ लाख 50 हजारांपेक्षा जास्त महिला ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्या सरपंचही होत आहेत. अर्थात यातील बऱ्याच महिला प्रतिनिधी या एखाद्या पुढाऱ्याची आई, बहीण वा पत्नी आहे. परंतु त्यांच्या उपस्थितीमुळे पूर्वीपेक्षा आता ग्रामपंचायत कार्यालयात होणारे निर्णय आणि त्यातला महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढलेला आहे. महिलांचा हा सक्रिय सहभाग ग्रामीण भागात एक सुप्त क्रांती करीत आहे. या पाच गोष्टींमुळे ग्रामीण भारताची जीवनशैली मोठ्या प्रमाणावर बदलली आहे.
15-16 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातली बहुतांश घरे ही पूर्णपणे मातीची असत. गावातल्या पाच-दहा श्रीमंतांचेच दगडी बांधणीचे वाडे वा सिमेंट काँक्रिटची घरे असत. आता पक्क्या विटा आणि सिमेंट क्राँकिटच्या घरांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सर्वसामान्य लोकही आता विटांची पक्की घरे बांधू लागले आहेत. गावातल्या अशा घरांची संख्या 70 टक्क्यापेक्षा जास्त आहे.
आर्थिक सुधारणांच्या वाटचालीत ग्रामीण भाग मागे असला तरी आपल्या देशात घडून येत असलेल्या आर्थिक- सामाजिक- शैक्षणिक क्रांतीत ग्रामीण भारत पूर्णपणे अस्पर्शित राहिलेला आहे असे म्हणणे धाडसाचेच नाही, तर वस्तुस्थितीशी प्रतारणा करणारेही आहे. देशाच्या कोणत्याही भागात आपण गेलो तरी खेडी वेगाने बदलत चालल्याचे चित्र पाहायला मिळते. गावकऱ्यांचे कपडे, भाषा, वाहने, घरांची रचना, शिक्षणाचे प्रमाण, मानसिकता, आशाआकांक्षा, एक्स्पोजर सारेच पालटताना दिसते आहे. सुधारणांचा लाभ झालेल्या शहरी भारतातून विकासाचा प्रवाह ग्रामीण भारतामध्ये झिरपत असल्याच्याच या खुणा आहेत. हे बदल ग्रामीण भारतात झिरपण्याची चॅनेल्स कोणती आहेत, ती कशा पद्धतीने सक्रिय होत आहेत, ग्रामीण भारत आणि शहरी भारत यांच्यात कशा प्रकारचे बदल घडून येत आहेत.