S R Dalvi (I) Foundation

भारतात जातीवाद कधी संपणार?

When will casteism end in India?

कसं मान्य करू की देश बदलत आहे?
कसं मान्य करू की जातीवाद मिटला आहे?
कसं मान्य करू भेदाभेद मिटले आहेत?

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन. आज भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इथे स्वातंत्र्यदिनाचा अर्थ “इंग्रजांच्या गुलामगिरीतून झालेली सुटका’ इतकाच मर्यादित राहिलेला असू शकतो. राज्यघटनेनुसार भारत हे लोकशाही राष्ट्र म्हणून जन्माला आले. असे असले तरी त्या संविधानातील मूल्ये, अधिकार – कर्तव्ये आणि केलेल्या तरतूदिंची पूर्तता आजतायगत होऊ शकलेली नाही. म्हणून या प्रपंचाच्या शीर्षकानुसार “समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?” हा प्रश्न साहजिकच पडून जातो.

धर्म आणि जातीव्यवस्था हा भारतीय लोकशाहीला लाभलेला शाप आहे. श्रद्धा आणि उपासनेच्या नावावर धर्मांध कट्टरतेचे पिक या देशातल्या गल्लीबोळात घेतले जाते. इतरांच्या श्रद्धास्थानाला नावबोटे ठेऊन हिंसा घडवून आणणारे धर्माचे अनुसारक असूच शकत नाही. येथे मनुस्मृती आणि शरीयत कायद्याचा दाखला देत, एकमेकांच्या धर्माला कमी लेखत मुदडे पाडले जातात. देशात फक्त दोनच धर्म आहेत असेही नाही. आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने स्वतःला ‘इतरेतर’ मानणारे सुद्धा त्या द्वेषाच्या आगीत आहुती देताना दिसून येतात.

ब्राम्हण, मराठा, राजपूत, जाट, ओबीसी, आदिवासी, दलित या जात – प्रवर्गांचा सर्रास वापर करून एकमेकांच्यात तेढ निर्माण केली जाते. काही उच्चशिक्षित, विशिष्ट समाजाचे विचारवंत प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमातून रोज टिकाटिपण्णी करून जात हा विषय चघळत असतात. आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी जाती धर्मावरून ते लढवतात, याची अद्यापही समज आपल्याला आलेली नाही. तरीसुद्धा आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय.

स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष झाली पण समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार? क्रांतिबा फुल्यांनी 1868 साली आपल्या वाड्यातील विहीर अस्पृश्यासाठी खुली केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली पाण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. 1950 साली संविधानात कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा दंडनीय अपराध ठरविण्यात आला. पण काल राजस्थानातील सुराणा  येथील घटनेने मन सुन्न झाले आहे. काय चुकी होती त्या लहान मुलाची?

इंद्र मेघवाल,अवघ्या तिसरीत शिकणारा विद्यार्थी तर होता तो, वय केवळ 9 वर्ष पण त्याने “सरस्वती” विद्या मंदिर शाळेतील पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून मनुवादी शिक्षकाने त्या मुलाला इतकं मारलं की तो जगण्याची लढाईच हरवून बसला. शिक्षक जे मुलांचे प्रेरणास्थान असतात त्यांनी असे वागणे योग्य आहे का?

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना त्या बाळाला अस्पृश्य ठरवून मारून टाकलं जातं. हे खूपच क्लेशदायक आहे. मी पहिल्यांदा आणि अंतिमत: भारतीय आहे, माझं ह्या देशातील माणसांवर प्रेम आहे. म्हणून या घटनेची मला शरम वाटते. स्वातंत्र्याचा सूर्य उगवून पंच्याहत्तर वर्ष तर झाली खरी पण समतेचं आकाश अजून देशाच्या अंगणात उतरलंच नाही. मला असे वाटते की केवळ जातीवादच नाही तर जातीव्यवस्था देखील आपल्या भारतात संपली पाहिजे.

स्वातंत्र्यदिन दरवर्षीच येत राहतील, मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तेव्हाच साजरा होईल जेव्हा भारत जातीवादमुक्त होईल. भारताच्या मोकळ्या आकाशात इथले दीनदुबळे, मजूर-शेतकरी, दलित-आदिवासी, बेरोजगार, स्त्रिया-बालके जेव्हा मोकळा श्वासघेतील. त्याच वेळेस स्वातंत्र्याचा खरा अमृत महोत्सव साजरा होऊ शकतो.

2 thoughts on “भारतात जातीवाद कधी संपणार?”

  1. Prabhat Madhukar Ballal

    सांध्या पासून बांध्यापर्यंत मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय ही मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जाती बद्दलची कट्टरता कमी होण्या साठी शिबीर मोहीम राबवली पाहिजे.

  2. Rohini Rangnath Mali

    खरंय “समतेचं आकाश देशाच्या अंगणात कधी उतरणार?”या प्रश्नाचं उत्तर आपण भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पण अजूनही मिळालेलं नाही आजही देशात जात धर्म माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत.ग्रामीण असो वा शहरी भाग जात काही जात नाही ठराविक विद्यार्थ्यांना काही ठिकाणी संधी देणे आणि काही विद्यार्थ्यांना डावलने,दुय्यम दर्जाची वागणूक देणे हे शाळांमध्ये दिसून येते एक शिक्षिका म्हणून मी याचा जमेल तेवढा विरोध केला आहे पण जात मनातून जात नाही तोवर स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला समजणार नाही.
    चिंतनीय..

Comments are closed.

Scroll to Top