Bappachya Manatl……
गणपती बाप्पा येणार म्हणून किती आनंद झाला होता. सगळीकडे खूपच प्रसन्न वातावरण होते. बाजारात खरेदीसाठी वाढणारी वर्दळ, मखर, डेकोरेशन, हार- तुरे, मोदकांची तयारी, पाहुण्यांना निमंत्रण सगळीकडे आनंदी आनंद होता. बाप्पा आले आणि १० दिवस राहून गेले पण जाताना खूप साऱ्या आठवणी देऊन गेले.
आपण बाप्पासाठी सगळं करतो पण ते बाप्पाला नक्की आवडत ना? असाच विचार करता करता माझे डोळे मिटले आणि माझ्या स्वप्नात बाप्पा आला. थोडस बोलायचं आहे असं म्हणाला. मी पुढल्या वर्षी तुझ्याकडे येणार नाही, तुझ्या घरी येण्याआधी मला खूप आनंद झाला होता पण येताना तू मला प्लास्टिकच्या पिशवीत झाकून घेऊन आलास माझा त्यात जीव गुदमरला होता. जंगी स्वागत करून मला घरी आणलस आणि थर्माकॉल च्या मखरात मला बसवलंस. खूप सुंदर फुलांची सजावट केली होतीस पण त्यातून सुंगंध येतच नव्हता, तेव्हा मला कळालं ही फुले तर प्लास्टिकची आहेत.
इतक्या मोठ्या घरात मी होतो पण पूर्ण दिवस एकटाच होतो. आरतीला फक्त २ ते ४ माणसे. येथे कोणालाच वेळ नाही. सगळ्या कुटुंबाने एकत्र यावं म्हणून आपण आपले सण साजरे करतो पण आता कोणी कोणाकडे आपुलकीने प्रेमाने येत जात नाही हे समजले. कंटाळा आला म्हणून मी पण टीव्हीवरच्या बातम्या बघत एक मोदक खाल्ला पण भेसळीची बातमी बघून मी तो मोदक पण तसाच सोडला.
कसे बसे हे १० दिवस गेले निरोपाची वेळ आली. पुन्हा एकदा तू निरोपाची जंगी तयारी केलीस. मला न कळणाऱ्या गाण्यावरही मुले नाचत होती माझ्याकडे कोणाचं लक्षच नव्हत. रस्त्यावरून जाताना खडयांध्ये गाडी आदळली आणि माझी मानच लचकली. माझी मूर्ती तू मातीची न घेता POP ची घेतली होती म्हणून मी तसाच समुद्रामध्ये तरंगत राहिलो, तुला शोधत होतो पण तू तर घरी निघून गेला होतास. खूप वाईट वाटलं मला. तेव्हाच मी ठरवलं मी पुढच्या वर्षी तुझ्याकडे येणार नाही. पुढल्या वर्षी येताना सरळ गावाचा रास्ता धरायचा जिथे अजूनही प्रेम जिव्हाळा, नाती गोती जपली जातात जिथे खऱ्या अर्थाने माझे लाड केले जातात.
इतके बोलून बाप्पा निघून गेला आणि माझे डोळे उघडले. काय करावे समजतच नव्हते. मी उठलो घरातील मंदिराजवळ गेलो हात जोडले आणि आधी बाप्पाची माफी मागितली. आणि त्याला वचन दिले पुढच्या वर्षी मी असे होऊ देणार नाही. प्लास्टिक, थर्माकोल, POP या सगळ्या निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या गोष्टींचा मी वापर करणार नाही. बाप्पा तुझी मूर्ती फक्त मातीची आणेन आणि खड्यांमधून तुला घेऊन जाणार नाही तुझे विसर्जन आम्ही घरातच करू आणि त्या मातीमध्ये एक सुंदर रोप लावू जेणेकरून तू आमच्यातच राहशील. माझ्या सगळ्या कुटुंबाला घरी तुझ्या दर्शनाला, प्रसादाला बोलावेल. वचन देतो बाप्पा मी तुझी सेवा उत्तमरीत्या करेल पण आता रागावू नकोस आणि पुढच्या वर्षी आनंदाने लवकर ये.