A library in the forest tea tapri !
केरळमधील इदुक्की जिल्ह्यात जंगलाच्या मधोमध वसलेल्या एका गावात काही लोकांनी एका चहा टपरीतच एक पुस्तकालय सुरू केलं. तिथल्या आदिवासी लोकांमध्ये त्यामुळे जे नवचैतन्य निर्माण झालं, त्याची ही गोष्ट…
एका चहावाल्यानं जंगलाच्या मधोमध पुस्तकालय उघडलं, आणि आजूबाजूला राहणारे लोक रोज पायपीट करत तिथं वाचायला येऊ लागले. आजच्या काळात एखाद्या शहरात किंवा गावात पुस्तकालय असणं ही काही आता फारशी नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. शहरी लोकांना पुस्तकालयाचं महत्त्वही तितकसं वाटत नाही. पण केरळमधील इदुक्की जिल्ह्यातील जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एडमलक्कुडी गावातील मुथुवान आदिवासी लोकांसाठी त्यांच्या जवळपास एखादं पुस्तकालय असणं हे जणू एक स्वप्नच होतं. 2010 साली या परिसरात दोन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे एडमलक्कुडी हे केरळमधील पहिलं असं गाव बनलं जिथं आदिवासी ग्राम पंचायत अस्तित्त्वात आली. दुसरं म्हणजे याच गावातील इरिप्पुकल्लू भागात एका लहानशा चहाच्या टपरीत एक छोटेखानी पुस्तकालय उघडण्यात आलं. हे कदाचित जगातील एकमेव पुस्तकालय असेल जे जंगलाच्या इतकं आत आहे की तिथं चालतच जावं लागायचं. मात्र आता ही परिस्थिती थोडी बदलली आहे आणि त्यामुळे एडमलक्कुडीला जीपनं जाणंही आता शक्य झालं आहे.
160 पुस्तकांपासून सुरू झालेल्या या पुस्तकालयाची सुरूवातीची गोष्ट ही दोन माणसांच्या योगदानाच्या आणि समर्पित वृत्तीच्या भवताली फिरते. त्यापैकी एक आहेत या चहा टपरीचे मालक श्री. पी. वी. छिन्नथंबी आणि दुसरे आहेत, स्थानिक शिक्षक श्री. पी. के. मुरलीधरन. मुरलीधरन हे मुथुवन आदिवासी लोकांसाठी कोण्या देवदूतापेक्षा कमी नाहीत. दोन दशकांपूर्वी त्यांनी एडमलक्कुडीला आपलं घर केवळ इतक्यासाठी बांधलं की जेणेकरून इथल्या आदिवासी लोकांना शिकवता येईल.
“लोक त्यांच्या टपरीवर चहा-नाश्त्यासाठी यायचे आणि मग इथेच पुस्तक वाचायचे किंवा थोडे पैसे देऊन काही वेळेपुरतं पुस्तकं घेऊन जायचे. त्यामुळे लवकरच हे पुस्तकालय लोकप्रिय झालं. नंतर तर अधिकाधिक लोक इथं चहा पिण्यापेक्षा पुस्तकं वाचण्यासाठीच येऊ लागले.” या पुस्तकालयाचं नाव ‘अक्षर’ असं ठेवण्यात आले. इथं एका रजिस्टरमध्ये लोकांना वाचायला दिल्या गेलेल्या पुस्तकांची नोंद ठेवण्यात येते. पुस्तकालयाची सदस्यता एकाचवेळी 25 रुपये देऊन किंवा दरमहिना 2 रुपये देऊनही मिळवली जाऊ शकते. इथली विशेष बाब अशी की सामान्य मासिकं किंवा लोकप्रिय पुस्तकांऐवजी, सिलप्पठीकरम् सारख्या उत्कृष्ट राजकीय साहित्यकृतींचा अनुवाद तसेच मलयालममधील प्रसिद्ध लेखक, वाईकोम वाईकोम मुहम्मद बशीर, एमटी वासुदेवन नायर, कमला दास, एम मुकुंदन, लालिथम्बिका अंठरजनम यांची पुस्तकं इथं प्राधान्यानं ठेवली आहेत.
छिन्नथंबी सांगतात की पुस्तकालय उघडून दहा वर्षं उलटली पण ग्राम पंचायतीनं त्यासाठी आर्थिक मदत करण्याचं आणि पुस्तकालयाची इमारत बांधण्याचं जे काही आश्वासन दिलं होतं ते अजून त्यांनी पूर्ण केलं नाही. त्यासाठी त्यांना अन्य कोणीच काहीही मदत केली नाही. ते दुःखी स्वरात सांगतात की, “आम्हाला सांगण्यात आलं होतं की स्थानिक ग्राम पंचायतीला यासाठी प्रशासनाकडून पन्नास हजार रुपये देण्यात आले आहेत म्हणून. जेव्हा पुस्तकालय उघडण्यात आलं तेव्हा ग्राम पंचायतीनं पुस्तकालय सुरू ठेवण्यासाठी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं ते अजून त्यांनी पाळलेलं नाही. सुरूवातीच्या काळात टपरीत पुस्तकांची देखरेख ठेवणं त्यांना सोपं पडायचं. पण आता पुस्तकांची संख्याही वाढली आहे आणि त्यांचे वाढतं वय बघता किती काळ हे काम ते करू शकतील काही सांगता येत नाही.” सध्या त्यांच्या पत्नीच्या आजारपणामुळे छिन्नथंबी हे आदिमली गावात होते.
“मोठ्या संख्येनं असलेल्या पुस्तकांची देखरेख करणं, जेव्हा छिन्नथंबी यांना अवघड जाऊ लागलं होतं तेव्हा सगळी पुस्तकं शाळेत नेली गेली आणि तिथं नवं पुस्तकालय उघडलं. याचंही नाव ‘अक्षर’ असंच कायम ठेवलंय.” ते पुढे सांगतात की आजवर पुस्तकालय उघडण्यासाठी, त्याच्या देखरेखीसाठी तसंच इतकी वर्षं ते चालू रहावं यासाठी इथल्या स्थानिक आदिवासी लोकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. ते विसरून चालणार नाही. याचं श्रेय ते जी. राजू यांना देतात जे शाळेच्या पॅरेंट्स टीचर असोसिएशन (PTA) चे अध्यक्ष आहेत. सर्वात शेवटी ते म्हणतात की, “राजू हे एडमलक्कुडी गावातील प्रतिष्ठीत वृद्ध लोकांपैकी एक आहेत ज्यांना नशिबानं उच्च विद्यालयापर्यंतचं शिक्षण घेता आलं. त्यामुळेच त्यांना पुस्तकालयाचं महत्त्व कळतं. पीटीएसोबतच यांचीही आम्हाला फार मदत होत आली आहे.”
तुमच्या आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना पुस्तकालयाचं महत्त्व तेवढं वाटत नसतं, पण एडमलक्कुडीसारख्या सुदूर जंगलातील गावात राहणाऱ्या लोकांसाठी हे केवळ पुस्तकालय नसून अन्य जगाला जोडणारा तो एक सेतू आहे. त्याचं पूर्ण श्रेय हे छिन्नथंबी आणि मुरली माश यांच्यासारख्या सेवाभावी लोकांना जातं.