How do kids get addicted to Mobile?
आजकाल मुल जन्माला येताच आई वडील व्हिडीओ कॉल द्वारे नातेवाईकांना बाळाचा चेहरा दाखवतात. नवीन जन्मलेल्या बाळाच्या नजरेसमोर येणा-या या पहिल्या प्रसंगातूनच बाळे मोबाईलशी परिचित होत असतील नाही का? आपल्या आई-वडील आणि घरातील इतर सदस्यांबरोबर मोबाईलही आपल्या आयुष्यातील एक घटक आहे, हे नक्कीच बाळांना जाणवत असणार. आता पालकही सतत मोबाइल वर असतात मुले त्यांचे अनुकरण करतात. आपल्या मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांना देखील मोबाईल ची सवय व व्यसन लागत आहे हे पालकांना समजायला हवे.
जेव्हा लहान मुले रडतात तेव्हा त्यांना गप्प करण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाइल देतात.काही पालक मुले जेवत नसतील तर मोबाइल मध्ये गाणी लावून त्यांना जेवण भरवतात. खरं तर मुलांना इथूनच मोबाईलची सवय लागते.पुढे हि सवय इतकी वाढते की याचा मुलांवर शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो.
साधा फोनही जेव्हा मागील काळात नवलाईची गोष्ट होती, तिथे दोन वर्षाच्या मुलांनाही आता मोबाईलवरचे अॅप्स चालवता येतात, यात काही नवल राहिले नाही. जितके फायदे, तितकेच तोटेही मोबाईलमुळे लहान मुलांच्या आयुष्यात घर करून बसले आहेत.
मैदानी खेळ सुटल्याने मुलं शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होत आहे. कोडी, बुद्धिबळ, नवा व्यापार, सापशिडय़ांसारख्या मनोरंजक व बौद्धिक खेळांची जागा मोबाईलच डोक्याने (मेमरीने) चालणा-या गेमने घेतली आहे. त्याचा परिणाम मुलांच्या बुद्धीच्या विकासावर व कल्पकतेवर होऊन मुलांची चंचल वृत्ती वाढीस लागत आहे. गोष्टीची पुस्तके कालबाह्य ठरून मोबाईलवर कथा, वाचल्या-पाहिल्या जातात, त्यामुळे पुस्तकांचे ते सुगंधीस्पर्शी अनुभव मुकत चालले आहेत.
मोबाईलच्या स्क्रीनमुळे डोळ्यांवर आणि रेंजेसमुळे शरीरावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. पालक आपल्या मुलांना घरी एकटे असतात आणि अडीअडचणीला इमर्जन्सी म्हणून मोबाईल घेऊन ठेवतात. असावा, काळानुसार गरजाही बदलत असतात. पण, त्यावर पण कंट्रोल ठेवला नाही, तर ह्याचा योग्य उपयोग न होता, मुले गेम्स, चॅटिंग, क्लिपिंग पाहणे, यासारख्या गोष्टींमध्ये स्वत:ला पूर्ण झोकून देतात. नेट सर्चिगमध्ये जशी कोणतीही चांगली माहिती क्षणात उपलब्ध असते, तशी वाईट गोष्टींचीही भर असतो. वयात आलेली मुले जर वाईट गोष्टींच्या आहारी गेली, तर त्याचे किती विपरीत परिणाम होतात, हे आपण पाहतोच. घरात पालकच हल्ली स्मार्टफोनवरील फेसबुक व व्हॉट्सअॅप सारख्या सुविधांमुळे घरातील आपला मोलाचा वेळ या अॅप्सवर खर्च करतात. त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संभाषण कमी होऊन अॅप्सवर जिव्हाळा अडकून पडला आहे. आता हे जग मोबाईल कंपन्यांच्या हातात आहे.
काही गोष्टी मोबाईलमुळे खरंच खूप चांगल्या झाल्या आहेत. गुगलसारख्या माध्यमातून हवी ती माहिती आज एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते.
कुठेही अडीअडचणीला व्यक्तींशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल हे उत्तम साधन आहे. लांबवर अगदी फॉरेनलाही असणा-या आपल्या जीवलगांबरोबर व्ही चाट सारख्या अॅपद्वारे सेकंदात दृष्टिभेट होते, त्यामुळे अशा दूरच्या व्यक्तींमध्ये बरीचशी जवळीक साधता येते.
कुठलीही गोष्ट म्हणजे मोबाईलही मुलांसाठी वाईट आहे, असे नाही. पण त्याचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे.मुलांना मोबाइलचे व्यसन लागू नये याची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.