How exactly should parents treat their children?
बरेचदा पालकांना असे वाटत असते की मुलांना ओरडले रागावले मुले त्यांना घाबरली म्हणजेच आपण उत्तमरीत्या मुलांना मोठे करीत आहोत. पण या मुळे मुले एकलकोंडी होत आहेत, ती घाबरट होत आहेत, त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत आहे असा विचार पालक करत नाही. अश्या वातावरणात वाढणारे मुल एक उत्तम नागरिक होऊ शकेल का?
मला असे वाटते पालकांनी मुलांना सांभाळताना, मोठे करताना नक्की विचार करावा की आपण त्यांना निरागसतेने, प्रेमाने वाढवत आहोत का? आपण मोठे झालो पालक झालो म्हणजे आपल्यातली निरागसता आपण विसरावी का? प्रत्येक आई वडिलांनी मुलांना कौतुकाने वाढवावे असे मला वाटते. मुले कौतुकाने फुलतात. मुलांना योग्य संस्कार आधीच दिले तर कोणतेही मूल त्याचे आयुष्य उत्तमरीत्या घडवू शकते. अलीकडे आईवडील दोघेही नोकरी निमित्ताने घराबाहेर असतात अश्यावेळी बाहेरील जगातील ताणतणाव, चिडचिडेपणा, कटकटी इत्यादी बाजूला ठेवावे बाहेरील गोष्टी बाहेर ठेवून घरी हसतमुखाने तुम्ही तुमच्या घरात यावे तुमच्या मुलांना खरोखरच आपुलकी, प्रेम व जिव्हाळा दाखवीत आहात, हे तुमच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करा तसे तुमच्या मुलांना जाणवू द्यावे.
तुमची मुले त्यांच्या वयानुसार दंगामस्ती करीत असणार, घरात पसारा करत असणार, प्रसंगी वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न विचारून तुम्हांला भंडावून सोडणार अस्या वेळेस तुमची चिडचिड वाढेल तुम्हाला राग येईल पण अशावेळी शक्य तितके शांत चित्त राहावे. मुलांवर रागावू नये, त्यांच्यावर ओरडू नये, कारण तुमची पाल्ये तुमच्या प्रेमळ सहवासासाठी आतुरलेली असतात. तेव्हा मुलांचा विचार करून तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू द्या. त्यांच्यावर जिव्हाळा व प्रेमाचा वर्षाव करा. त्यांनी केलेल्या मस्ती बद्दल त्यांना क्षमा करा. त्यांची एखादी कृती कशी चुकीची आहे अथवा त्यांना कशी अहितकारक आहे, हे त्यांना गोड बोलून समजावून सांगा. मुलांना किमती वस्तू खाऊ यापेक्षा तुमचा प्रेमळ सहवास, आपुलकी आणि जिव्हाळा महत्त्वाचा वाटतो आणि तो देण्यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही अथवा फारसे श्रमही पडत नाहीत. फक्त पालक ह्या नात्याने हे सर्व, तुम्ही तुमच्या पाल्यासाठी सहज करण्याची तयारी ठेवावयास हवी. मुलांशी नेहमी सीमित, संयमित, विवेकशील वागावे. मुलांना वाढवताना ‘लाड व प्रेम’ यातला फरक तुम्हाला जाणता आला पाहिजे. मुलांच्या विशिष्ट वयापर्यंत विशिष्ट वेळी त्यांचे लाड करावेही लागतात.
सर्वागीण परिस्थितीचा वेध घेऊन पालक आई-बाबांनी कधी लवचिक, कधी तटस्थ तर कधी कठोर अशा स्वरूपाचा वर्तनव्यवहार पाल्य मुलां-मुलींशी केल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते.