How to help children with homework
शाळेत चांगला अभ्यास होण्यासाठी पालकांनी मुलांच्या अभ्यासात आणि त्याच्या शालेय जीवनात रस घेतला पाहिजे. काही, अती काळजी घेणारे पालक, आपल्या प्रिय मुलासाठी अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्ग शोधतात, त्याच्यासाठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, लिखित असाइनमेंट पूर्ण करतात. ते योग्य नाही. पण त्याला पोहायला शिकवल्याशिवाय सरळ पाण्यात फेकून देणंही अशक्य आहे. मुलाला मदत करणे आवश्यक आहे, परंतु त्याला जबाबदारीपासून मुक्त करू नये, दडपून टाकू नये, पण त्याचे स्वातंत्र्य विकसित करावे.
पालक म्हणून आपल्या पाल्याच्या अभ्यासात लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यामध्येच आपल्या मुलाचा अभ्यास आणि त्याला दिलेले प्रकल्प पूर्ण करून घेणं या गोष्टी येतात. तुम्हाला जरी इंग्रजी बोलता येत नसेल किंवा कळत नसेल. किंवा इतर कोणताही विषय समजत नसेल तरीही तुम्ही तुमच्या पाल्याला मदत करू शकता.
गृहपाठात मदत करण्यासाठी :
भाषा आणि कलेमध्ये सहाय्य : चांगलं वाचन करून उत्तम लेखक होण्यासाठी तुमच्या मुलाला प्रोत्साहन द्या.
गणितामध्ये सहाय्य : गणित हा विषय समजून घेऊन त्याच्यावर प्रेम करायला शिकवा.
विज्ञानात सहाय्य : विज्ञानातील प्रकल्पांसाठी नव्या कल्पना राबवा. काही गमतीशीर गोष्टींचा अवलंब करून विज्ञान हा विषय त्याच्यासाठी सोपा करा.
समाजशास्त्र सहाय्य : तुमच्या मुलाला जगातील इतर भाषा आणि संस्कृतींची ओळख करून द्या.
गृह्पाठासाठी चांगली जागा तयार करा :
घरातील शांत जागा, एकचएक ठराविक वेळ अभ्यासासाठी निवडण्यामुळे मुलं त्यांना दिलेला गृहपाठ योग्य त-हेने पूर्ण करू शकतील. अशी जागा पालक आणि मुलांना एकत्र काम करायला मदत करेल. शांत जागा आणि वेळ निवडा. उदा. टी.व्ही., रेडियो, व्हिडियो गेम्स इ. चा आवाज येणार नाही अशी जागा किंवा ज्या वेळेत हे सर्व बंद असेल अशी वेळ निवडा. अभ्यासासाठी स्वतंत्र सोय नसेल तर बेडरूममधील टेबल उत्तम राहील, पण स्वयंपाक घरातील टेबल किंवा बैठकीच्या खोलीत टेबल केव्हाही उत्तमच राहील. योग्य आणि आवश्यक प्रकाश खिडकीतून किंवा दिव्यातून मिळू शकेल अशी सोय करा. शाळेच्या आवश्यक वस्तू उदा. कंपास, पेन्सिल, रबर यांचा साठा करून ठेवावा. पुस्तकांसाठी शेल्फ बनवा. त्यावर शाळेचे प्रकल्प, गोष्टींची पुस्तकं, डिक्शनरी अशा त्याच्या वस्तू पद्धतशीरपणे मांडून ठेवाव्यात. अभ्यास करण्याची ती जागा पेन्सिल होल्डर, आवडते फोटो, चित्र, छोटी झाडं, फुलं यांनी सजवा. त्यामुळे तिथलं वातावरण प्रसन्न राहील.
सकारात्मक दृष्टीकोन :
शाळेत चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलाची शाळा आणि त्याचा अभ्यास हा त्याच्यासाठी आणि कुटुंबियांसाठी आवश्यक गोष्टी आहेत हे त्याला कळू द्यावे . तुम्ही तुमच्या मुलाचे पहिले आणि महत्त्वाचे शिक्षक आहात, इतर कोणापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता. तुम्हीच त्याची उत्तम काळजी घेऊ शकता. त्याच्या शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर सामील व्हा. गृहपाठापासून ते शिक्षक पालक सभेपर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्या. तुमचे आणि तुमच्या मुलाचे संबंध चांगले असतील तर त्याला शाळेत कसलाच त्रास होणार नाही. मुलाना शाळा, नाती, मित्रपरिवार, काम आणि एकंदर मोठं होताना अनेक प्रश्न पडतात. त्यात त्यांना मदत करा. चांगले श्रोते बना. लहान मुलांना त्यांच्या शाळेविषयी खूप बोलायचं असतं. त्यासाठी थोडा वेळ काढून त्याचं ऐका. थोडं मोठं झाल्यावर ते जास्त बोलत नाहीत. धीर धारा. त्यांच्याशी संवाद साधण्याचे इतर मार्ग शोधा. मुलाचं तोंडभरून कौतुक करा. त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो हे त्यांना कळू द्या. मुलांना पाठींबा द्या. गुणाकार किंवा निबंध या सारखा अवघड अभ्यास करताना त्याला मदत करा. शाळेत काही समस्या निर्माण झालीच तर ती निवारण्यासाठी त्याला पाठींबा द्या.