Topic: Walking School Classes in Mumbai: Launch of ‘School On Wheels’ for children who are unable to get an education
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) गरीबात गरीब आणि श्रीमंतांपैकी श्रीमंत लोक राहतात. या शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत जी फूटपाथवर राहून रात्र काढतात. या कुटुंबातील मुलांसाठी शाळेचा उंबरठा चढणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. शहरातील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मुंबईत नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलांना ‘स्कूल ऑन व्हील्स’ (School On Wheels) अंतर्गत शिक्षण दिले जाईल. ज्याला फिरते वर्ग असेही म्हटले जात आहे. हे शिक्षण पूर्णपणे मोफत असेल. स्कूल ऑन व्हील्समध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच या शाळेत सर्व आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. हे अभियान यूथ विद ए मिशन संस्थेने सुरू केले आहे.
संस्थेच्या मुंबई युनिटने शहरातील बेघर असलेल्या मुलांना गरजा आणि सेवा देण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. आताच्या युगात लहान मुले, तरुण आणि महिलांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही शाळा ऑन व्हील संगणक सुविधांनी सुसज्ज करण्यात आली असून बेघर समाजाला मोफत शिक्षण दिले जात आहे. ‘स्कूल ऑन व्हील’ बसमध्ये विकसित करण्यात आली आहे. या बसमुळे शहरातील विविध भागात फूटपाथवर राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.