Education of tribal children
आदिवासी समाज हा भारतातील एक महत्त्वपूर्ण समाज मानला जातो: त्याची आपली एक बोलीभाषा; संस्कृती आणि ओळख आहे. हा समाज पूर्वीपासूनच डोंगरी भागात वास्तव्य करीत असल्याने या समाजाचा सामाजिक व आर्थिक विकास हवा तेवढया प्रमाणात झालेला दिसून येत नाही: तसेच या समाजासाठी शासनस्तरांवरुन अनेक सुविधा किंवा योजना देण्यात येत असल्या तरी; बोलीभाषा; आत्मविश्वास, उदासिनता; भौतिकसुविथांच्या अभावामूळे यांच्यापर्यंत सहज शिक्षण पोहचत नाही,तरी शासनास्तरांवरुन आश्रमशाळा; शिष्यवृत्ती, विविध प्रकल्पातंर्यत यांच्या शिक्षणाची सोय करण्याचा प्रयत्न होत आहे: महत्त्वपूर्ण एकच यांच्या शिक्षणाचा उद्येश सफल झाल्यास यांच्यातील प्रतिभावंताना न्याय तर मिळेलच परंतु त्यांच्या मार्फतच या समाजाला प्रवाहात सामील करण्यास मदत होईल. ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आपण साजरा केला जातो. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, आदिवासी बांधव या अमृतमहोत्सवात कसे जीवन जगत आहे ते वाड्या-पाड्यापर्यंत जाऊन पाहिल्याशिवाय समजणार नाही.
’कोणत्याही मागासलेल्या समाजाची सुधारणा करावयाची असेल तर त्यासाठी त्या समाजात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे.’ वाचताना अगदी सामान्य वाटणारा हा विचार खरच एक प्रवाह आहे. कारण शिक्षणामुळे कोणत्याही व्यक्तीची दृष्टी व्यापक व विशाल बनते. आपल्या सभोवतालच्या परिसराचे आकलन होते. आपण जगाच्या बाजारपेठेत कुठे आहोत याची जाणीव होते. ७५ वर्षात देशाने खूप प्रगती केली. वायू वेगाने चालणारी बुलेटट्रेन देशात आली, शहरे वाढत गेली, गावे ओस पडत गेली. पण देशातील आदिवासी बांधव आजही आपल्या वाड्या पाड्यावरच पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहे. आज देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी महिला विराजमान झाल्या त्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली. पण एखाद्या समाजातील एक व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान झाली म्हणजे त्या समुदायाची उन्नती झाली असा होऊ शकत नाही.
स्वातंत्र्यानंतर आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या असा कागदोपत्री उल्लेख आपणास आढळतो. परंतु जे स्वतः आदिवासी जीवन जगत आहेत, त्यांच्या जागेवर जावून स्वतः आदिवासी जीवन जगून पाहिल्यास अगदीच तोडक्या प्रमाणात योजना आणि त्यासुद्धा अगदीच प्रभावहीन राबविण्यात आल्याचे आपणास दिसून येईल. आज मेडीया, वर्तमानपत्रे यामुळे काही प्रमाणात यातील विदारक सत्य बाहेर येवू लागल्याने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात झाल्याचे आपल्या निदर्शनात येईल. परंतु या सर्व योजनांचा मुख्य भर शेतीवर स्थिर झालेल्या आदिवासींवर असल्याचे दिसून येते. आपली स्वताची आणि तीही पुरेशा प्रमाणात शेती असणा-या आदिवासींचे प्रमाण आणि शेती नसलेल्या आदिवासींचे प्रमाण जवळपास समान आहे. असे असूनसुद्धा ज्यांना शेती नाही, जे मोलमजुरी करून जीवन जगतात त्यांच्यासाठी काही नियोजन असल्याचे आपणास आढळून येत नाही. अशा परिस्थितीत आदिवासी विकास कसा साधला जाणार हा गहन प्रश्न आहे. महागाईने कंबरडे मोडलेले असल्याने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भूमिहीन आदिवासी हतबल झाला आहे.
वर्षानुवर्षे पोटापाण्यासाठी आदिवासी कुटुंबाचे होणारे स्थलांतर हे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खूप घातक परिणाम करत आहे. वीटभट्टी, कोळसा भट्टी,किटा पाडणे (लाकडू तोडणी), ऊस तोडणीसाठी जेव्हा आदिवासी बांधव स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांच्यासोबत शाळेत असणारी मुलंही स्थलांतर होत असतात. मुलांना शिकण्याची खूप इच्छा असते, पण आईवडिलांच्या जीवन जगण्याच्या संघर्षात त्यांना शाळा सोडून जावं लागतं. वर्षानुवर्षे आदिवासी बांधवांचे होणारे स्थलांतर हे मुलांच्या शिक्षणाच्या पथ्यावर पडत आहे. डोळ्यासमोरून आपलं बिऱ्हाड घेऊन ज्यावेळी पालक मुलांना घेऊन स्थलांतरित होत असतात, त्यावेळी शाळेकडे पाहत पाहत पोरांचे व पालकांचेही डोळे ओले होतात. पण पोटाच्या खळगीसाठी काळजावर दगड ठेऊन आदिवासी बांधव स्थलांतरित होत असतात.
विशेष जाणवणारी बाब म्हणजे शाळेतील शिक्षण आणि शाळेबाहेरील मुलांचे नित्य जीवन यात सुसंवाद राहिलेला नाही. त्यामुळे मुले शाळेला कंटाळतात. शाळा सोडून गावात, जंगलात भटकणे पसंत करतात. शाळेचा कंटाळा, न्यूनगंड, उदासीनता यांनी पछाडलेली असतात. शाळेत त्यामुळे गळतीचे प्रमाण मोठे आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती, अज्ञान, उदासीनता यांसारख्या गोष्टींची नित्याची अडचण असते. लहान पोरांच्या डोळ्यातील शाळेची ओढ पाहून परिस्थिती समोर हतबल व्हावं लागतं. बालवयात ज्या चिमुकल्या डोळ्यांनी शाळेत जायचं स्वप्न पाहिलं होतं, शाळा शिकून मोठेपणी डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस व्हायचं ठरवलं होतं हे मुलांचे स्वप्न परिस्थितीमुळे स्वप्नच राहत आहे. पाठ्यपुस्तकात आदिवासी मुलांना गोडी वाटत नाही. त्यांच्या अवतीभोवतीच्या समाजाचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात त्याना दिसत नाही. मुलांच्या सामाजिक आणि मानसिक गरजा ही पाठ्यपुस्तके व सध्याचा अभ्यासक्रम पुरवू शकत नाही. जीवन आणि शिक्षण यांचा ताळमेळ कुठे लागत नाही. त्यांच्यात कधी सुसंवाद होत नाही. आदिवासींच्या बोली भाषांचाही प्रश्न आहे. ७४ बोली भाषा आहेत. परंतु प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्यात कुठे ताळमेळ बसत नाही. भाषा हे संस्कृती संवर्धनाचे मोठे माध्यम आहे. आदिवासी बोली भाषा ही त्यांची ख-या अर्थाने अस्मिता आहे. तिला जोपासून आदिवासीला प्रादेशिक भाषेतून शिक्षण देता येईल का? असा विचार झालेला नाही त्यामुळे आदिवासींचा चेहरा पुसला जाणार नाही.
आदिवासी मुलांना शिकवून पुढे आणायचे असेल तर प्राथमिक शाळेपासून त्यांची तयारी करावी लागेल. प्राथमिक शाळेत त्यांची चांगली तयारी झाल्यावर त्यांचे मनोधैर्य वाढेल. मानसिक दुर्बलता कमी होईल यातून त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होईल. अज्ञानाच्या अंधकारात बुडालेले, मागासलेपणाच्या भोव-यात सापडलेल्या आदिवासी जनतेपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्यासाठी आश्रमशाळा बरोबर महाविद्यालये, तंत्रनिकेतने, व्यावसायिक शिक्षण संकुले, क्रीडा प्रबोधिनी, व्यायामशाळा, व्यावसाय मार्गदर्शन मंच, स्पर्धा परीक्षा केंद्रे आदि शैक्षणिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. यातून आदिवासींच्या उद्याच्या नवनिर्माणाचे भवितव्य घडेल. सक्तीचे व मोफत शिक्षण असूनही ‘झाडांची पाने गळावित तशी शाळेतून लेकरं टपाटपा गळत आहेत’ हे चित्र बदलण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे.