How to make a speech on Independence Day?
असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचत असते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून, आवाजावरून, आणि बोलण्याच्या कौशल्यावरूनच ओळखले जाते. राजकारणी असो कि शिक्षक असो, आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाषण हा सर्वोत्तम मार्ग आहे.
कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांत स्वातंत्र्य दिन सोहळ्याची जंगी तयारी सुरू आहे. १५ ऑगस्टच्या आपल्या बालपणीच्याही काही आठवणी असतील. जेव्हा आपण विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून शाळेत जात होतो किंवा १५ ऑगस्टच्या भाषणाची तयारी करत होतो. ते दिवस आपल्याला विसरता येणार नाहीत. आजही आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो, तेथे १५ ऑगस्टचे भाषणही दिले जात असेलच. अनेकांना माईकसमोर येऊन बोलायला भीती वाटते. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन ही अशांसाठी एक नामी संधी असते.
जर तुम्ही शाळेत शिक्षक असाल तर १५ ऑगस्टचे भाषण आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. अन्य ठिकाणीही १५ ऑगस्टचे भाषण देण्याची परंपरा असतेच असते. अनेकांना माइकसमोर येऊन बोलायला भीती वाटते पण लक्षात ठेवा, आपले विचार इतरांसमोर मांडण्याची याहून चांगली संधी कामाच्या ठिकाणी पुन्हा कधीही मिळणार नाही.
सर्वात आधी मनातील भीती दूर करून आपण भाषण करू शकतो हा आत्मविश्वास मनात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. भाषणाची सुरुवात कशी करावी? चांगली सुरुवात करण्यासाठी काय करावे? सुरुवातीला काय बोलावे? कोणती गोष्ट सांगावी? स्वतःची ओळख करावी का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. अशा वेळेस नक्की काय करावे? भाषणाची तयारी नक्की कशी करावी ते आपण पाहुयात.
जेव्हा स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो तेव्हा कर्तव्याविषयीही बोलणे गरजेचे आहे. आपल्या भाषणातून सभोवतालच्या लोकांना उद्देशून सांगा की, अनेकदा ते कशाप्रकारे बेजबाबदारपणे वागतात. त्यांना सांगा की, छोट्या-छोट्या प्रयत्नांनी ते राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान कसे देऊ शकतात. उदा. वाहतुकीचे नियम पाळणे, आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांची मदत करणे यासारख्या गोष्टींचे महत्त्व लोकांना पटवून द्या. आपल्याकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतील तर आपले भाषण एकदा लिहून काढा आणि नंतर बोला पण आपलं म्हणणं आटोपशीर आणि मोजक्याच शब्दांत मांडा. अनेकजण आपलं भाषण पाठांतर करून मांडण्याचा प्रयत्न करतात. अशातच जेव्हा हे पाठांतर केलेले मुद्दे विसरतात तेव्हा निराश होतात. ध्यानात ठेवा, आपला हेतु हा लोकांपर्यंत आपले विचार पोहचविणे हा आहे, ही फक्त औपचारिकता नको. अशातच त्यांच्याशी बोलताना नेहमीप्रमाणेच सामान्यपणे बोला. आपले म्हणणं पाठांतर केल्यासारखं मांडू नका. आपलं भाषण अधिक श्रवणीय होण्यासाठी म्हणी आणि छोटे-छोटे किस्से सांगा. चांगली शायरी किंवा कवितेचा आपल्या भाषणात समावेश करा.
शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी एक निश्चित वेळ असेल. खूप छोटे भाषण असल्यास त्यातून स्वातंत्र्यदिनाचे महत्व नीट सांगितले जाणार नाही. दुसरीकडे, खूप मोठे भाषण असल्यास ते एकसूरी आणि कंटाळवाणे होईल. भाषणाचा आशय हा स्पष्टपणे प्रारंभ, मध्य भाग आणि निष्कर्ष ह्यामध्ये विभागला गेलेला असावा. एकदा तुम्ही उपशीर्षकांची यादी तयार केली की, प्रत्येक उप-शीर्षकासाठी बोलण्याची वेळ लक्षात ठेवून प्रत्येक उप-शीर्षकासाठी लिहायला सुरुवात करा. प्रत्येक उपशीर्षकासाठीवेळेची मर्यादा ठरवून घ्या आणि भाषण थांबवतानाची वाक्ये बोलण्यासाठी काही क्षण ठेवा.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या क्रांतिकारानी एका महान देशाचे स्वप्न पहिले होते आणि त्यांनी लोकांच्या कौशल्यांवर, आकांक्षावर आणि सामूहिक क्षमतेवर विश्वास ठेवला. स्वतंत्र भारतामध्ये त्यांनी जपलेल्या आदर्शांनुसार जाण्याची आकांक्षा बाळगून आपण क्रांतिकारकांच्या स्मृतीचे कौतुक केले पाहिजे. ते आदर्श म्हणजे सहिष्णुता, लोकशाही, समानता, सर्वसमावेशकता आणि विविधतेमध्ये एकता इत्यादी होत.
तुमच्या भाषणात आधुनिक भारताला सामोरे जाताना कुठले अडथळे पार करावे लागले तसेच भारताचा समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य संग्रामातून घेतलेले धडे ह्यांचा थोडक्यात समावेश केला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेल्या कामगिरीवर भर दिला पाहिजे. जेव्हा ब्रिटिशांनी शेवटी भारत सोडला तेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या वसाहतीच्या अस्तित्वाबद्दल खूप साशंक होते. भारताच्या कर्तृत्वामुळे पश्चिमेकडील देश गोंधळात पडले. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षात , भारतामध्ये केवळ एक कार्यक्षम लोकशाही तर होतीच परंतु एक अतिशय सक्रिय आणि यशस्वी अणुशक्तीही होती. जगातील फक्त काही राष्ट्रांनी ह्याची बरोबरी केली आहे.
शेवटच्या निवेदनात आदर्श नागरिक बनण्याची आणि आपल्या संविधानात नमूद केलेल्या आदर्शांनुसार जगण्याची वचनबद्धता समाविष्ट असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य लोकशाही यासंदर्भात काही राष्ट्रीय किंवा परदेशी महान नेत्याचे प्रसिद्ध आणि प्रेरणादायी कोट्स भाषणाच्या शेवटी वापरता येऊ शकतात. भाषणाचा समारोप म्हणजे निष्कर्ष काढणे. संपूर्ण भाषणाचा गाभा हा समारोपात सामावलेला असतो. तुम्ही या भाषणातून काय घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे हे समारोपातून बोलायचे असते. शेवटी सर्वांचे आभार मानून आपल्या भाषणाची नम्रपणे सांगता करायची. समारोप करतानाही चारोळी,शायरी,सुविचार वगैरेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेवट करताना ज्यांनी तुम्हाला बोलायची संधी दिली त्यांचे आणि ज्यांनी तुम्हाला शांतपणे ऐकून घेतला त्यांचेही आभार मानायला विसरायचे नाही. हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन सावकाशपणे आपल्या जागेवर बसावे.